sachin tendulkar and arjun tendulkar । हैदराबाद : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI vs SRH) यजमान सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक लगावली. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी कालचा दिवस खूप खास होता. कारण मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने काल आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतली. ३ वर्षे मुंबईच्या संघासोबत राहिल्यानंतर अखेर रविवारी अर्जुनने केकेआरविरूद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमधील दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करून ज्युनिअर तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले.
दरम्यान, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सचिन तेंडुलकरचे कौतुक करत असताना मास्टर ब्लास्टर सचिनने देखील एका वेगळ्या शैलीत लेकाच्या कामगिरीचे कौतुक केले. सचिनने ड्रेसिंगरूममध्ये अर्जुनचे कौतुक करताना म्हटले, "तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाच्या नावे एका विकेटची नोंद झाली आहे." सचिनने असे म्हणताच ड्रेसिंगरूममध्ये एकश हशा पिकला.
बहीण साराने देखील भावाचं केलं कौतुक काल झालेल्या सामन्यानंतर सारा तेंडुलकरने आपल्या भावासाठी इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी ठेवली. सारा तेंडुलकरनेने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये लिहले, "या दिवसाची खूप मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होते". तसेच तिने दुसऱ्या स्टोरीमध्ये म्हटले, "मी काल झालेला सामना पुन्हा पुन्हा पाहत आहे." कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंनी देखील अर्जुनला पहिल्या विकेटसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईचा सलग तिसरा विजय राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात रोहितसेनेने यजमानांना पराभवाची धूळ चारली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९२ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन (६४) आणि इशान किशन (३८) यांनी स्फोटक खेळी करून हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. १९३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला हॅरी ब्रुकच्या (९) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर मयंक अग्रवालने (४८) डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला रिले मेरेडिथने तंबूत पाठवले. अखेरच्या काही षटकांमध्ये हेनरिक क्लासेनने (३६) स्फोटक खेळी केली पण फिरकीपटू पियुष चावलाने त्याला आपल्या जाळ्यात फसवले. अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारचा बळी घेऊन मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हैदराबादचा संघ १९.५ षटकांत सर्वबाद केवळ १७८ धावा करू शकला. मुंबईच्या संघाने १४ धावांनी विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक लगावली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"