India vs South Africa Test Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजेच २६ डिसेंबरपासून या मालिकेची सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी सुरूवातीला रोहित शर्माची संघाच्या उपकर्णधारपदासाठी निवड झाली होती. पण दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे आता विराटला लोकेश राहुलच्या रूपात उपकर्णधार मिळाला आहे. मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण आफ्रिका दौऱ्यात जवळपास सर्वच बडे खेळाडू पुनरागमनास सज्ज आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे दोन अनुभवी वेगवान गोलंदाजदेखील छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदान गाजवण्यास सज्ज आहेत. पण भारतीय संघाचा महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मतानुसार, बुमराह किंवा मोहम्मद शमी नव्हे तर मोहम्मद सिराज हा मालिकेतील सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. सचिनने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या वक्तव्यामागचं कारणही पटवून दिलं.
"सिराज गोलंदाजी करत असताना त्याच्यात प्रचंड ऊर्जा दिसते. जणू काही त्याच्या पायात स्प्रिंग लावली आहे. सिराज हा एक असा गोलंदाज आहे, ज्याच्या चेहऱ्याकडून बघून तुम्ही अंदाज बांधू शकत नाही की हे दिवसाचं पहिलं षटक आहे की शेवटचं षटक आहे. कारण तो संपूर्ण सामन्यात त्याच ऊर्जेने गोलंदाजी करत असतो. त्याच्या चेहऱ्यावर कधीही थकवा जाणवत नाही. तो एक सुयोग्य असा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या देहबोलीतून तो संघात ऊर्जा निर्माण करू शकतो आणि मला त्याचा हाच सकारात्मक अँटीट्यूट खूप आवडतो", अशा शब्दात सचिनने मोहम्मद सिराजचं तोंडुभरून कौतुक केलं.
"सिराज हा एक चांगला विद्यार्थी आहे. तो आसपासच्या गोष्टींमधून पटापट शिकतो. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कसोटीमध्ये त्याने पदार्पण केले. पण तो ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता, त्यावरून तो त्याचा पहिला सामना आहे असं अजिबात वाटत नव्हतं. खेळाडू म्हणून जी परिपक्वता अपेक्षित असते ती त्याने त्यावेळी दाखवली आणि संघाला गरज असताना भेदक गोलंदाजी केली. हे त्याचं बलस्थान आहे. त्या सामन्यानंतर मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. उलट दरवेळी तो जेव्हा नव्या मालिकेत गोलंदाजी करायला येतो त्यावेळी तो काहीनाकाही नवीन शिकून येतो. त्याच्या याच गुणांमुळे तो एक चांगला गोलंदाज आहे. भारताच्या ताफ्यात सिराजचा खूप उपयोग होऊ शकतो", असंही मास्टरब्लास्टरने स्पष्टपणे सांगितलं.
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, जयंत यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशांत शर्मा