नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आजपासून टी-२० विश्वचषकाचे (T20 World Cup 2022) बिगुल वाजले आहे. सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि नामिबिया (SL vs NAM) हे संघ आमनेसामने होते. आशियाई चॅम्पियन श्रीलंकेला पराभूत करून नवख्या नामिबियाने इतिहास रचला आहे. या विजयासह नामिबियाच्या संघाने सुपर-१२ च्या फेरीकडे कूच केली असून संघाच्या आजच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देखील नामिबियाच्या खेळीचे विशेष कौतुक केले आहे. आजच्या सामन्याचा धक्कादायक निकाल पाहून सर्वांनाच धक्का बसला. या सामन्यात आशियाई चॅम्पियन असलेल्या श्रीलंकेवर नामिबियाच्या नवख्या संघाने ५५ धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकरने ट्विट करून नामिबियाच्या संघाचे विशेष कौतुक केले आहे. "नामिबियाच्या संघाने आज क्रिकेटच्या विश्वाला सांगितलं आहे की, 'नाम याद रखना", अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने नामिबियाच्या संघाचे कौतुक केले. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाने २० षटकांत ७ बाद १६३ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सर्वबाद केवळ १०८ धावा करू शकला.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर नवख्या नामिबियाच्या संघाने सुरुवातीच्या पडझडीतून सावरत श्रीलंकेसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात कुशल मेंडिस (६) बाद झाला. त्यानंतर बेन शिकोंगोने निसंका (९) आणि गुणतिलका (०) यांना पाठोपाठ बाद करत श्रीलंकेचा डाव अडचणीत आणला. त्यानंतर धनंजय डि सिल्व्हा बाद झाला. तेव्हा श्रीलंकेच्या धावफलकावर ४० धावा लागल्या होत्या.
नामिबियाने रचला इतिहास
अशा बिकट अवस्थेतून भानुका राजपक्षे (२०) आणि दसून शणाका (२९) यांनी लंकेला सावरले. मात्र राजपक्षे बाद झाल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी पुन्हा कोसळली. हसरंगा (४), शणाका (२९), मदुशान (०) आणि करुणारत्ने (५) हे पाठोपाठ बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ९ बाद ९२ अशी झाली होती. त्यानंतर तीक्षणा आणि चमीरा यांनी शेवटच्या गड्यासाठी १६ धावा जोडत श्रीलंकेला शंभरीपार नेले. मात्र अखेरीस वीजाने चमिराला बाद करत श्रीलंकेडा डाव १०८ धावांवर संपुष्टात आणला. नामिबियाकडून स्कोल्ट्झ, शिकोंगो, फ्रायलिंक आणि वाईज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स टिपले, तर स्मित याने एक बळी टिपला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांचे व्हॅन लिंगेन (३) आणि ला कूक (९) दोन्ही सलामीवीर १६ धावांमध्येच माघारी परतले. त्यानंतर इटोन (२०), इरास्मस (२०), ब्राड (२६) आणि वाईस (०) हे ठराविक अंतराने बाद होत गेल्याने नामिबियाची अवस्था ६ बाद ९३ अशी झाली होती.
मात्र अखेरच्या ३४ चेंडूत फ्रायलिंक आणि जेजे स्मित यांनी ७० धावांची तुफानी भागीदारी करत नामिबियाच्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. फ्रायलिंकने २८ चेंडूत ४४ तर जेजे स्मित याने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा कुटत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. फ्रायलिंक डावातील शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. दरम्यान, श्रीलंकेकडून मदुशान याने दोन, तर तीक्षणा, चमीरा, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड
अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-१२ फेरी
गट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sachin Tendulkar praises namibia team after SL vs NAM Namibia beat Sri Lanka by 3 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.