पुणे : क्रिकेटशौकिन पालकांचे एक स्वप्न असते, की आपला पाल्य क्रिकेट खेळावा आणि त्याने सचिन तेंडुलकरसारखा विक्रमवीर होऊन नावलौकिक करावा. पुण्यातील या पालकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्थापन केलेल्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अॅकॅडमीसाठी पुण्याच्या खेळाडूंची निवड चाचणी शिबिर दिनांक १२ नोव्हेंबरपासून कॅम्प भागातील बिशप्स हायस्कूलच्या मैदानावर सुरू करण्यात आली आहे. या निवड चाचणीच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर उद्या बिशप्सच्या मैदानावर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मैदानावर हजर राहणार आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पुण्यातील माजी रणजीपटू मिलिंद गुंजाळ, शंतनू सुगवेकर, संतोष जेधे, एनसीएचे मार्गदर्शक अतुल गायकवाड, प्रदीप सुंदरम यांसह इंग्लंडकडून खेळणारे काही माजी कसोटीपटू या शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत. या शिबिरासाठी पुण्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त ७ ते १८ वयोगटातील क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. या शिबिरातून चांगल्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्या निवड झालेल्या खेळाडूंना अॅकॅडमीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या शिबिरासाठी बिशप्स हायस्कूलच्या मैदानावर १० नेट पिच करण्यात आली आहेत.