नवी दिल्ली: T20 क्रिकेटची सुरुवात 2006 साली इंग्लंडमधून झाली. टीम इंडियाने आपला पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये भारताने 6 गडी राखून विजय मिळवला होता. हळूहळू क्रिकेटचा हा फॉर्मेट संपूर्ण जगात सर्वाधिक लोकप्रिय झाला. आत्तापर्यंत भारताने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 159 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 101 सामने जिंकले आहेत आणि 51 सामने गमावले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, टी-20 मध्ये भारताच्या इतक्या मोठ्या इतिहासात असे 3 खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी टी-20 करिअरमधील पहिला सामना हा शेवटचा सामना ठरला.
राहुल द्रविडकसोटीत भारतीय संघाची भिंत समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने भारतासाठी फक्त एकच टी-20 सामना खेळला आहे. राहुल द्रविडने 31 ऑगस्ट 2011 रोजी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा पदार्पणाचा सामना द्रविडचा शेवटचा टी-20 सामना होता. द्रविडने हा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला, त्यात 21 चेंडूत 31 धावा केल्या. मँचेस्टरमध्ये झालेला तो सामना भारताने गमवला होता. विशेष बाब म्हणजे त्या सामन्यात द्रविडने समित पटेलच्या एका षटकात सलग तीन षटकारही ठोकले होते.
सचिन तेंडुलकरक्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात सचिनने 12 चेंडूत केवळ 10 धावा केल्या आणि चार्ल्स लँगवेल्टच्या चेंडूवर बाद झाला. त्या सामन्यात 2.3 षटकेही टाकली, ज्यात 12 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. हा सामना सचिनचा आंतरराष्ट्रीय T20 मधील पहिला आणि शेवटचा सामना होता. त्यानंतर तो कधीही भारतीय संघाकडून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नाही.
दिनेश मोंगियादिनेश मोंगियाला टीम इंडियाच्या इतिहासातील पहिल्याच T20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, ही संधी दिनेश मोंगियाची T20 मधील पहिली आणि शेवटची संधी होती. या सामन्यात दिनेश मोंगियाने 45 चेंडूंचा सामना करत 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतर त्याला कधीही भारतीय संघात टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मोंगियाला आयपीएलमध्येही खेळण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे त्याचा पदार्पण टी20 सामना शेवटचा सामना ठरला. दिनेश मोंगियाने 18 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर खेळाला अलविदा केले.