sachin tendulkar । मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सतत चर्चेत असतो. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होत असतो. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिलेल्या सचिनने पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला आहे. सचिनने वानखेडे स्टेडियमवर त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वेस्ट इंडिजविरूद्ध आपला २००वा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.
दरम्यान, सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील सर्वात भावनिक दिवसाची आठवण करून देत त्या दिवशी त्याच्या आईकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने भाष्य केले आहे. मास्टर ब्लास्टर तेंडुलकरला त्याच्या आईने कधीही स्टेडियममध्ये खेळताना पाहिले नव्हते. परंतु शारीरिक आव्हानांना न जुमानता सचिनची आई आपल्या लेकाचा शेवटचा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर उपस्थित होती.
सचिन तेंडुलकर भावूकसचिनने 'मिंट'च्या हवाल्याने म्हटले, "मी इतकी वर्षे क्रिकेट खेळलो, पण माझ्या आईने माझ्या शेवटच्या सामन्यापूर्वी एकही सामना पाहिला नव्हता. मी आईला सांगितले की तुला माझा शेवटचा सामना पाहायला यावे लागेल. ती शारीरिकदृष्ट्या स्टेडियममध्ये येण्यास सक्षम नव्हती, तिला स्टेडियममध्ये येऊन सामना पाहणे फार कठीण होते, परंतु तिने माझ्यासाठी येणार असल्याचे सांगितले आणि ती व्हीलचेअरवर सामना पाहण्यासाठी उपस्थित झाली. जेव्हा माझ्या आईला मोठ्या पडद्यावर दाखवले तेव्हा तो खूप भावनिक क्षण होता."
तसेच तेंडुलकरने एक गोष्ट उघड केली जी त्याचे वडील त्याला नेहमी सांगत असत. "मला अजूनही आठवते, मी भारताकडून खेळायला सुरुवात केली होती आणि मी माझ्या वडिलांसोबत कुठेतरी जात होतो. माझे वडील मला म्हणाले की, तू तुझे स्वप्न पूर्ण केले आहेस. त्यानंतर काय… तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी आयुष्यात एक चांगला माणूस व्हावे अशी त्यांची इच्छा आहे, कारण चांगुलपणा ही एक गोष्ट आहे जी नेहमीच सोबत राहणार आहे", असे सचिनने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"