सीहोर – क्रिकेटर सचिन तेंडुलकर ज्यांना क्रिकेटचा देव मानलं जातं त्यांनी निवृत्तीनंतर अनेक सामाजिक कार्यात उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. सीहोर जिल्ह्यातील ५६० आदिवासी मुलांच्या भवितव्याची जबाबदारी सचिननं स्वीकारली आहे. या मुलांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेशी सचिन तेंडुलकरनं एकत्रित काम सुरु केले आहे.
सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील दुर्गम गावचा दौरा केला. सचिन तेंडुलकर इंदूरमार्गे देवास जिल्ह्यातील खातेगाव संदलपूर इथं पोहचले. ज्याठिकाणी सचिननं एनजीओच्या एका कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी सचिन तेंडुलकरनं त्यांच्या वडिलांची आठवण सांगत म्हणाले की, माझ्या वडिलांना नेहमी वाटायचं लहान मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे. आज ते आपल्यात उपस्थित असते तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता असं त्यांनी सांगितले. ही सामाजिक संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करते. त्याला सचिन तेंडुलकर मदत करत आहेत.
सचिन तेंडुलकरनं येथील इमारतीची पाहणी केली. सचिनचा दौरा खूप गोपनीय ठेवण्यात आला होता. परंतु सकाळी देवासच्या रस्त्यावरुन सचिनचा ताफा निघाला तेव्हा लोकांनी लगेच सचिनला ओळखलं. त्यानंतर सचिन तेंडुलकर ज्या रस्त्याने प्रवास करणार होता त्याठिकाणी दुतर्फा लोकांनी तिरंगा हातात घेऊन सचिनचं स्वागत केलं. अनेकांनी सचिनच्या कारवर फुलांचा वर्षाव केला. सचिन सफेद शर्टमध्ये गाडीच्या पाठीमागच्या सीटवर बसला होता. सचिनसोबत यावेळी परदेशी पाहुणेही होते. सचिनच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
मिळालेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकरनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेंडुलकरसाठी आजचा दिवस खास होता कारण आजच्याच दिवशी सचिननं २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सीहोर जिल्ह्यातील सेवनिया, बीलपाटी, खापा, नयापुरा, जामून या गावातील मुलांना सचिन तेंडुलकर फाऊंडेशनकडून भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील अधिक मुलं माध्यमिक शाळेत शिक्षण घेतात. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिदिन दोन वेळचे भोजन, नाश्ता आणि शिक्षण दिलं जाते असं गावकरी सांगतात. तसेच राज्यातील ४२ गावांमध्ये सचिन तेंडुलकरकडून अशारितीने शैक्षणिक मदत केली जाते. त्याच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी सचिन देवास जिल्ह्यात पोहचला होता.
Web Title: Sachin Tendulkar secret visit to Devas in Madhya Pradesh; He gave light to his father's memories
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.