ठळक मुद्देक्रिकेटच्या इतिहासात 15 नोव्हेंबर या तारखेला विशेष महत्त्व आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेतेंडुलकरने 200 कसोटी सामने खेळले
मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात 15 नोव्हेंबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. 1989 साली आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मुश्ताक मोहम्मद आणि आकिब जावेद यांच्यानंतर कसोटीत पदार्पण करणारा तो युवा क्रिकेटपटू ठरला होता. 29 वर्षांपूर्वी ज्या युवा खेळाडूने क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली तो आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो.
मुंबईच्या लाजाळू किशोरवयीन खेळाडूला पाहून कोणी विचारही केला नव्हता की एक दिवस हा विक्रमांचा एव्हरेस्ट उभा करेल. 24 च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तेंडुलकरने 200 कसोटी सामने खेळले आणि त्याने 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या. त्याच्या नावावर 51 कसोटी शतकं आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या कसोटीत तेंडुलकर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी होती. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील 409 धावांचा पाठलाग करताना भारताचे चार फलंदाज 41 धावांवर माघारी परतले होते. मनोज प्रभाकर बाद झाल्यानंतर तेंडुलकर मैदानावर आला. त्याने 24 चेंडूंत दोन चौकार लगावत 15 धावा केल्या. त्यासह मोहम्मद अझरुद्दीनसह 32 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या वकार युनूसने तेंडुलकरला त्रिफळाचीत केले. विशेष म्हणजे युनूसनेही कसोटीत पदार्पण केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त शाहिद सईद आणि सलिल अंकोला यांनीही पदार्पण केले होते. सईद आणि अंकोला यांचा हा पहिला आणि अखेरचा सामना ठरला होता.