Sachin Tendulkar neighbour tweet : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगभरात 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिन आपल्या विनम्र स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या या स्वभावाची चर्चा केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेर खऱ्या आयुष्यातही होत असते. त्याच्या चांगल्या वागणुकीची लोक स्तुती करत असतात. त्याच्या विनम्र आणि तत्पर स्वभावाचे नुकतेच एक उदाहरण मुंबईत दिसून आले. सचिन तेंडुलकरने असे काही केले की, काही वेळापूर्वी त्याच्यावर नाराज असलेले शेजारी खुश झाले आणि सचिनवर इम्प्रेस झाल्याचे पाहायला मिळाले. नक्की काय घडलं, जाणून घेऊया सविस्तर.
मास्टर ब्लास्टरच्या एका शेजाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सचिनच्या वांद्रे येथील घरी काम सुरू असल्याने आवाज येत होता. त्याबाबत तक्रारीच्या स्वरात ही पोस्ट करण्यात आली होती. पण सचिनने त्या पोस्टकडे अजिबात दुर्लक्ष न करता, संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून निर्णय घेतला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलीप डिसूझा या अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'प्रिय सचिन तेंडुलकर, सध्या रात्रीचे 9 वाजले आहेत आणि तुमच्या वांद्रे घराबाहेर दिवसभर आवाज करणारा सिमेंट मिक्सर अजूनही जोरात सुरु आहे. तो अजूनही आवाज करत आहे. कृपया तुम्ही तुमच्या घरी काम करणाऱ्या लोकांना योग्य वेळेचे पालन करण्यास सांगू शकाल का? खूप खूप धन्यवाद.'
सचिनने दाखवली तत्परता
सचिनने या ट्विटकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संपर्क साधला. खुद्द दिलीप डिसोझा यांनी याला दुजोरा दिला. पाठपुरावा केल्यामुळे दुपारी सचिनच्या ऑफिसमधून फोन आला, असे त्याने दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितले. त्यांनी त्यांचे म्हणणे सविस्तरपणे सांगितले आणि कमीत कमी आवाज व्हावा अशी विनंती केली. सचिनच्या ऑफिसकडूनही त्यांना दिलासा मिळाला.
या पोस्टनंतर आता सचिनच्या शेजाऱ्यांचे ते ट्विट चर्चेत आले आहे. या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कोणी डिसोझा यांच्यावरच टीका करत आहेत, तर कुणी कायदेशीर कारवाईची मागणी करताना दिसत आहे. पण सचिन तेंडुलकर अशा खेळाडूंपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सचिन सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ शेअर करतो ज्यामध्ये तो काही वेळा चाहत्यांसोबत वेळ घालवताना दिसतो.