भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने जागतिक क्रिकेटमध्ये ठसा उमटवला. २४ वर्षे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हादेखील वडिलांसारखाच क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणार का? याची चर्चा गेली अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अर्जुनला IPL 2021च्या पर्वात मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतलं होतं. पण दुखापतीमुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडून यावं लागलं. आता आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला संधी देण्यात आली आहे. तो केवळ सचिनचा मुलगा असल्यानेच त्याला संघात निवडलं का? असा सवाल क्रिकेटरसिकांकडून सोशल मीडियावर विचारला जातोय. या प्रश्नाचं उत्तर खुद्द मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) निवड समिती अध्यक्ष (चीफ सिलेक्टर) सलील अंकोला यांनी दिलं.
सलील अंकोला यांनी भारताकडून काही सामने खेळले आहेत. त्यांनी अर्जुनबाबतच्या प्रश्नांना उत्तर दिलं. “अर्जुन काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. पण जेव्हापासून तो दुखापतीतून सावरला आहे तेव्हापासून त्याने सरावाला सुरूवात केली असून तो खूपच चांगली गोलंदाजी करतो आहे. मुंबई क्रिकेटचं भविष्य लक्षात घेता या संघाची निवड केली जाते. अर्जुन तेंडुलकरने गेल्या काही दिवसांच्या सरावादरम्यान गोलंदाजीत सुधारणा करून दाखवली आहे. दुर्देवाने तो आधी दुखापतग्रस्त झाला होता. पण दुखापतीतून सावरल्यानंतर त्या जे सामने खेळले त्यात त्याचा खेळ नक्कीच उल्लेखनीय होता.” अशा शब्दात सलील अंकोला यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या निवडीच्या चर्चेवर पडदा टाकला.
अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत एकही रणजी सामना खेळलेला नाही. मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून त्याने दोन टी२० सामने खेळलेले आहेत. यंदाच्या वर्षी पृथ्वी शॉ याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईचा संघ आतापर्यंत ४१ वेळा रणजी करंडक जिंकलेला आहे. त्यामुळे मुंबई संघाचा समावेश एलिट ग्रुप सीमध्ये करण्यात आला आहे. मुंबईच्या संघाचा सलामीचा सामना १३ जानेवारीपासून महाराष्ट्र संघाविरुद्ध होणार आहे.
रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईचा संघ- पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराझ खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अमान खान, शॅम्स मुलाणी, तांशू कोटीयन, प्रशांत सोळंकी, सशांत आतर्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बादियनी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर