Join us  

"क्रिकेट असो की आयुष्य, भागीदारीला उद्देश असला की समाधान मिळतं"; सचिनचा युवांना मोलाचा सल्ला

‘बियॉण्ड बाउंड्रीज’ या नव्या उपक्रमाच्या वेळी सचिन तेंडुलकरने लावली हजेरी

By विराज भागवत | Published: October 04, 2023 6:50 PM

Open in App

Sachin Tendulkar: शून्याची किंमत एखाद्या संख्येच्या भागीदारीने वाढते, त्यामुळेच आयुष्य असो किंवा क्रिकेट भागीदारी महत्त्वाची. त्यातही त्या भागीदारीचा एखादा चांगला उद्देश असेल तर ती बाब समाधान देते, असे मत भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. क्रिकेट आणि जीवनात शून्याचे आणि भागीदारीचे महत्त्व किती, असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला होता. "शून्य जेव्हा एकटं असतं तेव्हा त्याची काहीच किंमत नसते. पण शून्याला जेव्हा एखाद्या आकड्याची साथ मिळते तेव्हा ते शून्य त्या आकड्याची किंमत वाढवते. भागीदारी खूप महत्त्वाची असते. क्रिकेट असो की इतर काही असो, जेव्हा भागीदारीला एखादा उद्देश असतो तेव्हा ते कार्य सफल झाल्यावर मनाला समाधान मिळते आणि नवी ऊर्जा मिळते," असे सचिन म्हणाला.

सचिन तेंडुलकर आणि आयसीसी (ICC) च्या सहाय्याने डीपी वर्ल्ड या लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने ‘बियॉण्ड बाउंड्रीज’ हा नवीन उपक्रम सुरू केला. जगभरात क्रिकेट या खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामध्ये डीपी वर्ल्ड आपले एण्ड-टू-एण्ड नेटवर्क आणि स्मार्ट लॉजिस्टिक्स क्षमता वापरून जगभरातील तळागाळातील क्रिकेट क्लबना, वेगळ्या उद्देशाने पुनर्वापरात आणलेली (रिपर्पज्ड) पन्नास शिपिंग कंटेनर्स वितरित करणार आहे. प्रत्येक कंटेनरमध्ये आवश्यक क्रिकेट उपकरणांचा समावेश असणार आहे.

पहिला कंटेनर पालघरच्या युवा क्रिकेटपटूंना

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात ICC ODI Cricket World Cup 2023 रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उपक्रमातील पहिल्या कंटेनरचे उद्घाटन डीपी वर्ल्डचे नवीन वर्ल्ड ग्लोबल अँबॅसडर सचिन तेंडुलकर यांनी मुंबईत केले. हा कंटेनर आचरेकर क्रिकेट अकॅडमीला देणगी स्वरूपात दिला जाणार आहे. ४० क्रिकेट किट्सचा समावेश असलेले पहिले डीपी वर्ल्ड कंटेनर महाराष्ट्रातील पालघर येथील चिखलीकर स्पोर्ट्स क्लबमध्ये स्थापित केले जाणार आहे. तर अन्य २१० किट्स आचरेकर क्रिकेट अकॅडमी आणि शिवाजी पार्क जिमखाना अकॅडमी यासारख्या काही अकॅडमींमधील तरुण क्रिकेटपटूंना दिले जाणार आहेत.

प्रत्येक कंटेनरमध्ये २५० किट्स असून किटबॅगमध्ये क्रिकेट बॅट, हेल्मेट, ग्लोव्ह्ज आणि पॅड्स असे साहित्य आहे. हे कंटेनर्स बहुपयोगी आहेत. कंटेनर्सवर स्कोअरबोर्ड, उन्हापासून संरक्षणाची सुविधा तसेच बसण्यासाठी सिटदेखील आहेत.

उपक्रमाबद्दल सचिन म्हणाला, "बियाँड बाऊंड्रीज उपक्रमाअंतर्गत जगभरात क्रिकेटचा प्रसार करण्याच्या डीपी वर्ल्डच्या उद्देशात मला सहभागी होता आलं याचा मला आनंद आहे. मी स्थानिक क्लबमध्ये क्रिकेट खेळूनच मोठा झालो. त्यामुळे क्रिकेट किट विकत घेणं किती कष्टाचं असतं ते मला माहिती आहे. त्यामुळे या उपक्रमाचे मला विशेष कौतुक आहे. जगभरातील छोट्या क्रिकेटपटूंमधील प्रतिभा जोपासण्याप्रति डीपी वर्ल्ड दाखवत असलेली बांधिलकी सुखद आहे. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात सहभागी होताना मला खूप उत्साह वाटत आहे.

दरम्यान, पुढील पाच वर्षांत, डीपी वर्ल्ड, ७५ देश व सहा खंडांना उत्तमरित्या जोडणाऱ्या जागतिक कनेक्शनचा लाभ घेऊन उर्वरित ४९ कंटेनर्स जगातील महत्त्वाच्या ठिकाणी वितरित करणार आहे. यात यंदाच्या स्पर्धेदरम्यान आणखी दोन कंटेनर्स वितरित केले जाणार आहे. ह्याबाबतचे तपशील लवकरच जाहीर केले जातील. वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात काढल्या गेलेल्या दर १०० धावांमध्ये दहा किट्स देणगी स्वरूपात दिली जातील.

"बियॉण्ड बाउंड्रीज हा उपक्रम सुरू करताना आणि त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर ह्यांचे डीपी वर्ल्ड परिवारात स्वागत करतानाही अभिमान वाटत आहे," असे डीपी वर्ल्डचे भारतीय उपखंड आणि मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष केविन डिसुझा म्हणाले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसचिन तेंडुलकर