Sachin Tendulkar : महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं यंदाच्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road safety world series ) मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी ही लीग सुरू करण्यात आली होती. पण, पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या खेळाडूंना अद्याप मानधन मिळालेले नाही. तेंडुलकर हा इंडियन लिजंड्स संघाचा सदस्य आहे आणि पहिल्या पर्वात त्यांनी जेतेपद पटकावले आहे. तेंडुलकरलाही त्या पर्वातील पूर्ण मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यानं यंदाच्या पर्वात न खेळण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेश मीडियानं हे वृत्त प्रसिद्ध केले. बांगलादेशचे खालेद महमुद, खालेद मशूद, मेहराब होसैन, राजीन सालेह, हन्नन सरकार आणि नफीस इक्बाल यांना अद्याप मानधनातील काहीच रक्कम मिळालेली नाही. तेंडुलकर या स्पर्धेचा सदिच्छादूत होतो आणि सुनील गावस्कर स्पर्धेचे आयुक्त होते. ''सचिन तेंडुलकर यंदा या स्पर्धेत खेळणार नाही. १ ते १९ मार्च या कालावधीत यूएईत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे पूर्ण मानधन न मिळालेल्या खेळाडूंपैकी तेंडुलकर एक आहे,''असे सूत्रांनी PTI ला सांगितले.
Second Innings Sports and Entertainment ही कंपनी स्पर्धेत सहभागी संघाचं काम पाहते. करार स्वाक्षरी करताना खेळाडूंना १० टक्के रक्कम दिली गेली. त्यानंतर ४० टक्के रक्कम ही २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देणे अपेक्षित होते आणि उर्वरित ५० टक्के रक्कम ही ३१ मार्च २०२१पर्यंत देणे अपेक्षित होते.