नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन इंडिया लीजेंड्स संघाचा कर्णधार आहे. सचिनच्या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली आहे. अशातच सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओची खूप चर्चा रंगली असून त्यावरून त्याला ट्रोल केले जात आहे. सचिन जेव्हा बॅटची ग्रीफ साफ करत असतो, त्यावेळी पाणी वापरात नसतानाही तो नळ चालू ठेवतो आणि हे पाहून चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे.
सचिन पाणी वाचवा मोहिमेचा एक भाग आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी अशा प्रकारे पाणी वाया घालवले म्हणून त्याला ट्रोल केले. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजबद्दल भाष्य करायचे झाले तर त्यात आठ संघ सहभागी झाले आहेत. खरं तर रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी ही मालिका खेळली जात आहे.
इंडिया लीजेंड्सचा संघ सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यु मिथुन, राजेश पवार आणि राहुल शर्मा.
...म्हणून खेळली जाते ही मालिकासचिन रोड सेफ्टीच्या मुद्द्यावरून जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतो. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज इंडिया इव्हेंटचा उद्देश हा रस्ता आणि वाहतूक सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स या संघांचा सहभाग आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा पराभव केला.