भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन हा जगातील महान फलंदाजांमध्ये गणला जातो. सचिनने त्याच्या कारकिर्दीत भल्याभल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. सचिनने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, अजूनही त्याने रचलेले असे काही विक्रम आहेत, ज्यांना मोडणे जवळपास कठीण मानले जाते.
सचिन तेंडुलकरचे 'हे' ५ विक्रम मोडणे अशक्य
- सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २६४ वेळा ५० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय, त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४५ आणि कसोटी क्रिकेटमध्ये १९९ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक ६६४ सामने खेळले आहेत, ज्यात २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एकमेव टी-२० सामन्याचा समावेश आहे. हा एक विश्वविक्रम आहे.
- सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला. पण त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि २०११ पर्यंत तो भारतासाठी क्रिकेट खेळत राहिला. भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सचिनने एकूण २२ वर्षे ९१ भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर हा विक्रम बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुशफिकुर रहीमच्या नावावर आहे, ज्याने १८ वर्षे आणि ९२ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. सचिनने कसोटीत ५१ आणि एकदिवसीय सामन्यात ४९ शतक झळकावली आहेत. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे. सचिननंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर ८२ शतकांची नोंद आहे.
- सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे. १९८९ ते २०१३ पर्यंत ६६४ सामने खेळताना सचिनने ३४ हजार ३५७ धावा केल्या, ज्यात १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश होता. या यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकारा २८ हजार १६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत २७ हजार ५९९ धावा केल्या आहेत.