भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना ऑल इंडिया काउंसिल ऑफ स्पोर्ट्स ( अखिल भारतीय क्रीडा परिषद) मधून हटवण्यात आले आहे. देशात क्रीडा क्षेत्रातील विकासाला मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं ही काउंसिल नेमली होती.
2015मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या काउंसिलची स्थापना केली होती. आता या काउंसिलमध्ये दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी क्रिकेटपटू कृष्णामचारी श्रीकांत यांची निवड केली जाणार आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. या काउंसिलमध्ये बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि भारताचा दिग्गज फुटबॉलपटू भायचुंग भुतिया यांचाही समावेश नाही.
तेंडुलकर आणि आनंद यांनी काउंसिलच्या मोजक्याच बैठकीला उपस्थिती लावली होती. तसेच पहिल्या काउंसिलचा कार्यकाळ मे 2019मध्येच संपला होता. आता दुसऱ्या काउंसिलमध्ये तेंडुलकर व आनंद यांना वगळण्यात आले आहे. शिवाय या काउंसिलची सदस्यसंख्या 27वरून 18 इतकी करण्यात आली आहे.
या काउंसिलमध्ये नव्यानं सहभागी केलेल्या सदस्यांमध्ये लिंबा राम ( तिरंदाजी), पीटी उषा ( धावपटू), बछेंद्री पाल ( पर्वतारोहक), दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट), अंजली भागवत ( नेमबाजी, रेनेडी सिंग ( फुटबॉल) आणि योगेश्वर दत्त ( कुस्ती) यांचा समावेश आहे.