अजाय मेमन, कन्सल्टींग एडिटर
जागतिक क्रिकेटमधला महान फलंदाज आणि भारतीयांचे दैवत असलेला सचिन रमेश तेंडुलकर आज ५० वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती पत्करून जवळपास दहा वर्षांचा कालावधी लोटला असला तरी त्याचा चाहतावर्ग तसुभरही कमी झालेला नाही. उलट क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये नव्या सचिनला जाणून घेण्याचे कुतूहल दिवसागणीक वाढलेलेच आहे. त्याच्यात असलेला सामाजिक दृष्टिकोन, सांस्कृतिक क्षेत्रातली त्याची मुशाफिरी चाहत्यांना 'अद्भुत तेंडुलकर'ची अनुभूती देते.
क्रिकेटमधली सचिनची आकडेवारी डोकं चक्रावणारी आहे. चाळिसाव्या वर्षी निवृत्ती स्वीकारणाऱ्या सचिनने आयुष्यातील तब्बल वर्षे २४ क्रिकेटच्या मैदानावर घालवली. अवघ्या १४व्या वर्षी रणजी करंडकात पहिले शतक झळकावून सचिनने आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला होता. १५ वर्षांचा झाल्यानंतर तर त्याने दुलीप आणि इराणी चषकातही शतकाला गवसणी घातली. त्यानंतर १९८९ साली वयाच्या १६व्या वर्षी सचिनने भारताकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळताना पाकिस्तानी तोफखान्याचा समर्थपणे सामना केला होता. २०१३ मध्ये २००वा आणि अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या सचिनने वनडे आणि कसोटीमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा पराक्रम करून ठेवलेला आहे. क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारांत सर्वाधिक शतकांसह अनेक विक्रमांचा एव्हरेस्ट आपल्या लाडक्या मास्टर ब्लास्टरच्या नावे आहे. विक्रमादित्य काही विक्रमांना मात्र मुकला. क्रिकेटमध्ये सचिनने विक्रमांचे इमले रचले असले तरी सर्वच विक्रम त्याच्या नावे नाहीत. काहींवर लारा आणि ब्रॅडमन या दिग्गजांचीसुद्धा मोहोर लागली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ब्रायन लाराच्या नावे आहे. तर सर्वाधिक सरासरीच्या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांना अद्यापही कोणी मागे टाकू शकलेले नाही. असे असले तरी १०० शतकांचा मानकरी (५१ कसोटी, ४९ वनडे) असलेला सचिन एकमेवाद्वितीयच. अद्वितीय तंत्रशुद्ध फलंदाजी आणि खेळातील कमालीचे सातत्य त्याला लहान वयातच मास्टर ब्लास्टर ही उपाधी देऊन गेले. सर्वाधिक शतकांसह अनेक विक्रमांचा एव्हरेस्ट आपल्या लाडक्या मास्टर ब्लास्टरच्या नावे आहे. विक्रमादित्य काही विक्रमांना मात्र मुकला. मात्र केवळ विक्रम आणि आकडेवारीच त्याची क्रिकेटमधील महानता पूर्णपणे अधोरेखित करू शकत नाही. क्रिकेटपलीकडे जाऊन त्याने चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळेच जगभरात जागोजागी सचिनचे चाहते बघायला मिळतात.
दुर्मिळातील दुर्मिळ खेळाडू
भारतीय जनमानसात सचिन तेंडुलकरची प्रतिमा देवतासमान आहे. त्याच्या आधी कुठल्याच भारतीय खेळाडूकडून चाहत्यांना इतक्या अपेक्षा नसायच्या. तो आउट झाला की टेलिव्हिजन संच बंद केले जायचे, देशात कुठल्याही प्रकारचा गोंधळ माजला असला तरी सचिन ही एक गोष्ट भारतीयांना एकसूत्रात बांधायची. मनभेद, मतभेद पुसून टाकण्याची ताकद सचिनच्या खेळात होती. या करिष्याच्या जोरावरच विविधतेने नटलेल्या भारताला त्याने एकसूत्रात बांधले. आज त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी त्याच्या भूतकाळातील कामगिरीकडे बघितले तर एकच गोष्ट सांगावीशी वाटते की सचिन तेंडुलकर हा दुर्मिळातील दुर्मीळ खेळाडू आहे.
खेळामुळे संपन्नता
सचिन खेळायचा तेव्हा स्डेडियम खचाखच भरलेले असायचे. त्यामुळे पैशांची गंगा खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये वाहायला लागली. कारण सचिन या नावामुळेच प्रायोजक हे टीव्ही प्रसारणकर्त्यांकडे यायला लागले. केवळ भारतच नाही, संपूर्ण जगाला सचिनने आपल्या खेळाच्या भरवशावर सुसंपन्न केले.
Web Title: Sachin Tendulkar who united the country; Masterblaster's half-century of brilliance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.