मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि आयकर अपील न्यायाधिकरण यांच्यातील सामन्यात महान क्रिकेटपटूने बाजी मारली. आयकर अपील न्यायाधिकरण ( ITAT) च्या मुंबई खंडपीठाने कर विवादात सचिनच्या बाजूने निकाल दिला आहे. ITATच्या खंडपीठाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2012-13मध्ये सचिनच्या पुण्यातील मालमत्तेवरील भाडे उत्पन्न शून्य असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.
या निर्णयामुळे सचिनचे 1.3 लाख रुपये वाचले आहेत. 2012-13 या वर्षांत पुण्यातील फ्लॅटसाठी भाडेकरू मिळाला नव्हता, त्यामुळे भाड्यातून येणा-या मिळकतीवर कर देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला. ITATने त्यामुळे 1.3 लाखांचा कर माफ केला. ITATने गतआठवड्यात जाहीर केलेल्या अहवालात सचिनने 2012-13 या वित्तीय वर्षात 61.23 कोटी रुपये कमावल्याचे नमुद केले होते.
एका फ्लॅटमधून त्याला प्रती महिना 15 हजार रुपये भाडे मिळते आणि आयकर विभागाच्या कलम 1961च्या सेक्शन 23(1) नुसार वेकंसी अलाऊंस मिळावा, असा दावा सचिनने केला आहे. त्याने सांगितले की, सॅफिर पार्क येथील फ्लॅटमधून कोणतेही उत्पन्न मिळाले नाही. वर्षभर फ्लॅट रिकामी राहिल्यास करदात्यांना वेकंसी अलाऊंस नियमानुसार सूट मिळायला हवी.
सचिनने पुण्यातील सॅफिर पार्क आणि ट्रेजर पार्क येथे अनुक्रमे 60.6 आणि 82.8 लाखांत दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. त्याने प्रती महिना 15000 रुपयांवर एक फ्लॅट भाड्यावर दिला आहे, तर दुसऱ्या फ्लॅटसाठी त्याला भाडेकरू मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्यावरील कर शून्य जाहीर करण्यात आले.