भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांनी शनिवारी आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूचा शुभेच्छा देण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ त्यांच्या घरी पोहोचले. रायजी यांनी 1940च्या दशतका 9 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 277 धावा केल्या. त्यात 68 ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. भारतानं बॉम्बे जिमखान्यात पहिला कसोटी सामना खेळला त्यावेळी रायजी 13 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट प्रवासाचे ते साक्षीदार आहेत. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
तेंडुलकरनं ट्विट केलं की,''श्री वसंत रायजी तुम्हाला 100व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. स्टीव्ह आणि मी तुमच्यासोबत चांगला वेळ घालवला आणि इतिहासाच्या काही जुन्या आठवणी जाणून घेतल्या. भारतीय क्रिकेटच्या आठवणींचा खजाना तुमच्याकडे आहे.'' रायजी यांनी लाला अमरनाथ, विजय मर्चंट, सी के नायडू आणि विजय हजारे यांच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर केला आहे.