२० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या Legends Cricket Leagueमध्ये वाद सुरू झाला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar) या लीगमध्ये खेळणार नसल्याचे शनिवारी जाहीर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना सोबत घेऊन ही लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये इंडियन महाराजा, आशियाई आणि जागतिक असे तीन संघ सहभाग घेणार आहेत. इंडियन महाराजा संघात युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान व युसूफ पठाण या स्टार खेळाडूंचा सहभाग आहे. यांच्यासोबत सचिनही दिसणार असल्याचे आयोजकांनी जाहीरातीत सांगितले होते. पण, सचिननं या लीगमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आणि चुकीची माहिती दिल्याप्रकरणी आयोजकांना नोटीसही बजावली आहे.
महान नायक अमिताभ बच्चन हे या लीगचे सदिच्छादूत आहेत आणि त्यांनी केलेल्या जाहीरातीत सचिनचे नाव घेतले गेले आहे. मुळात सचिन या लीगमध्ये खेळणार नाही आणि चुकीची माहिती देत असल्याचा दावा सचिननं केला आहे.
इंडियन महाराजा संघाकडून कोण कोण खेळणार?युवराजसह वीरेंद्र सेहवाग, हरभजन, इरफान, युसूफ, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाळ राव, मुनाफ पटेल, संजय बांगल, नयन मोंगिया आणि अमित भंडारी हेही या लीगमध्ये खेळणार आहेत. २० जानेवारीपासून ओमान येथील अल अमेरट क्रिकेट स्टेडियमवर ही लीग खेळवण्यात येणार आहे. इंडियन महाराजा या संघासह आशिया आणि रेस्ट ऑफ दी वर्ल्ड असे दोन संघाचाही लीगमध्ये सहभाग असणार आहे.
आशिया लायन्स संघाकडून शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कालुवितरणा, तिलकरत्ने दिलशान, अझर महमुद, उपुल तरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल आणि अस्गर अफगान हे खेळताना दिसतील.