मुंबई - लॉर्ड्स कसोटीत इंग्लंड संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवताना भारतीय संघाला चीतपट केले. इंग्लंडमध्ये खेळलेल्या मागील 11 सामन्यांत यजमानांनी भारताला नऊ वेळा पराभवाची चव चाखवली आहे. मात्र, लॉर्ड्सवरील पराभव हा भारतीय खेळाडू व चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.
( India vs England Test: म्हणून आम्ही हरलो, विराट कोहलीचा मोठा खुलासा)
जलद गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. इंग्लंडने हा सामना एक डाव व 159 धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा निकाल भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर यालाही पचेनासा झाला आणि त्याने त्यावर भाष्य करणारे ट्विट केले.
( India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव)
त्याने या ट्विटमध्ये जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच अष्टपैलू खेळी करणा-या ख्रिस वोक्सचीही प्रशंसा केली, परंतु त्याच वेळी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला,'इंग्लंडने अष्टपैलू कामगिरी केली. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी दमदार गोलंदाजी केली आणि ख्रिस वोक्सचे कौतुक करावे तितके कमीच... मात्र या पराभवाने भारतीय खेळाडूंनी खचण्यापेक्षा पुढील आव्हानांसाठी सज्ज व्हायला हवे.'
अँडरसनने दुस-या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात केवळ एक विकेट घेणा-या ब्रॉडने दुस-या डावात चार फलंदाजांना माघारी धाडले. त्यात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश होता. वोक्सने दोन विकेट आणि नाबाद 137 धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली.
Web Title: Sachin Tendulkar's advice to Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.