विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना अत्यंत रोमहर्षक झाला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला तगडी टक्कर देत लक्षवेधी धावसंख्या उभारली होती. विजयासाठी २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांत तंबूत परतले. पण, ग्लेन मॅक्सवेल लढला, त्याच्या तुफानी खेळीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मॅक्सवेलच्या द्विशतकी खेळीचं सर्वत्र कौतुक होत असून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मॅक्सच्या खेळीला बेस्ट रिप्लाय दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांवर माघारी परतले होते आणि समोर २९२ धावांचे लक्ष्य होते. तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन २९२ धावांचे लक्ष्य अशक्यच होते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल ही शक्यता फक्त ११ टक्के लोकांनाच होती. पण, ग्लेन मॅक्सवेलचे वादळ घोंगावले.. तू फक्त उभा राहा असा मॅसेज त्याने पॅट कमिन्सला दिला आणि या पठ्ठ्याने दुसऱ्या बाजूने प्रहार केला. मॅक्सवेलने आठव्या विकेटसाठी कर्णधार पॅट कमिन्ससाठी ९३ चेंडूंत शतकी भागिदारी पूर्ण केली आणि त्या कमिन्सचा वाटा फक्त ८ धावांचा होता. मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स जोडीने १७० चेंडूंत २०२ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि त्यात कमिन्सच्या केवळ १२ धावा राहिल्या. मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २१ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावा केल्या.
मॅक्सवेलच्या या खेळीचं क्रिकेट विश्वात कौतुक होत असू सचिन तेंडुलकरनेही मॅक्सवेलच्या द्विशतकाची खेळी, मी पाहिलेली माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट खेळी होती, असे सचिनने म्हटले. तसेच, अफगाणिस्तान संघाचंही कौतुक केलं आहे. ''इब्राहिम झादरानच्या अप्रतिम खेळीने अफगाणिस्तानचा संघ सुस्थितीत होता. अफगाणिस्ताने गोलंदाजीतही सुरुवातीच्या काही षटकांत चांगला खेळ केला. या सामन्यातील पहिली ७० षटकं अफगाणिस्तान उत्तम खेळले. मात्र, शेवटच्या २५ षटकांमधील ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी त्यांचं नशीब बदलण्यास कारणीभूत ठरली, असे सचिनने म्हटले आहे.