भारत विरुद्ध पाकिस्तानचा रोमांचक सामना, प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान आणि धावपट्टीवर उतरलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी हा क्षण म्हणजे खेळातील पर्वणीच. मात्र, हा क्षण आता इतिहासजमा झाला आहे. केवल आठवणींमधून किंवा रिप्लेमधूनच हे क्षण पुन्हा पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळते. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या १९९६ मधील नैरोबी येथील सामन्यातील सचिनची तुफानी खेळी आजही इतिहास जिवंत करते. सचिनच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजीच येथील मैदानावर झाली होती.
सचिनने नैरोबीच्या याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आपलं सर्वात जलद शतक झळकावलं होतं. सचिनने ज्या बॅटने हे गतीमान शतक झळकावलं ती बॅट आज पाकिस्तानमध्ये पडीक आहे. वकार युनूसने ही बॅट पाकिस्तानच्या बुम बुम शाहिद आफ्रिदीला दिली होती. स्वत: आफ्रिदीनेच या बॅटीबद्दल सांगितले होते. मात्र, ही बॅट वकार युनूसकडे कशी पोहोचली याची माहिती त्याने दिली नव्हती. याच बॅटीची कथा आज उलगडली जाणार आहे.
सचिन तेंडुलकरच्या ज्या बॅटीची आज चर्चा होत आहे, त्या बॅटने शाहिद आफ्रिदीने १९९६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३७ चेंडूत शतक ठोकले होते. त्यावेळी, एकदिवसीय सामन्यातील हे सर्वात वेगवान शतक बनले. तब्बल १८ वर्षे हा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर राहिला. त्यामध्ये, आफ्रिदीने ११ षटकार आणि ६ चौकार लगावले होते. एका मुलाखतीत आफ्रिदीला या शतकावेळी वापरलेल्या बॅटसंदर्भाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना होय ही बॅट सचिनचीच आहे, असे तो म्हणतो. त्यानंतर, पुन्हा ही बॅट तुम्ही कधी वापरली नाही का? असा प्रश्न निवदेकाकडून विचारला जातो. त्यावर, नाही, ती बॅट अद्यापही तशीच आहे. कारण, ती बॅट पडीक आहे, आता तिच्या आराम करण्याचे दिवस आले आहेत. त्या बॅटचा खूप वापर झालेला आहे, मलाही ती बॅट वकार युनूस यांनी सामन्याच्या एक दिवस अगोदर दिली होती. वार्मअप करण्यापूर्वी वकारने मला ही बॅट देताना म्हटले होते, पठाण ये ले आज इस बॅट से खेल, असा इतिहास शाहीद आफ्रिदीने सांगितला.
भारतीयांना निराश करणारं आफ्रिदीचं उत्तर
आफ्रिदेच्या उत्तरावर मुलाखतकार सचिन तेंडुलकरचे आभार मानतो, तसेच अशाच प्रकारे आमच्या मुलांना सचिन यांनी बॅट देत राहावी, असेही म्हणतो. मात्र, आफ्रिदीला निवदेकाचं हे कौतुक टोचतं. त्यामुळे, अँकरला मध्येच थांबवत आफ्रिदी म्हणतो, मला अशीही माहिती मिळालीय की, सचिन त्या बॅटने खेळताना शुन्यावरही बाद झालाय. आफ्रिदीच्या या उत्तरावर दोघेही हसतात. दरम्यान, निश्चित आफ्रिदीचं हे उत्तर सचिनच्या चाहत्यांना आणि भारतीयांना आवडणारं नाही.
दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि वकार युनूस यांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. त्यातही, वकारने पहिली विकेट सचिनचीच घेतली. त्यामुळे, पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यातूनच सचिनने ही बॅट वकार युनूसला भेट म्हणून दिली होती.