वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) रणजी करंडक स्पर्धेच्या पदार्पणात शतक झळकावून इतिहास रचला. गोवा संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जूनने काल १७८ चेंडूचा सामना करताना शतकी धावांचा टप्पा ओलांडला. २४ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने रणजी करंडक स्पर्धेत कारकीर्दिची सुरुवातही शतकाने केली होती. सचिनने अर्जुनच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली.
मास्टर ब्लास्टर म्हणाला, "हा खूप कठीण प्रश्न आहे, जो मला कोणीही विचारला नाही. मला माझ्या वडिलांनी जे सांगितले तेच मी एक वडील म्हणून अर्जुनला सांगेन. जेव्हा मी भारतासाठी खेळायला सुरुवात केली होती आणि कोणीतरी माझ्या वडिलांची ओळख 'सचिनचे वडील' अशी करून दिली होती. तेव्हा माझ्या वडिलांच्या मित्राने विचारले की त्यांना कसे वाटते. तेव्हा वडील म्हणालेले, माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे, कारण प्रत्येक वडिलांना असेच घडावे असे वाटत असते. तुमच्या मुलाच्या कामाने तुम्हाला ओळखायला हवं.''
"अर्जुनचे बालपण सामान्य नक्कीच नव्हते. एक क्रिकेटपटूचा मुलगा म्हणूनच त्याच्याकडे नेहमी पाहिले गेले. हे इतके सोपे नाही आणि हेच एकमेव कारण आहे की जेव्हा मी निवृत्त झालो आणि मुंबईतील माध्यमांनी माझा सत्कार केला, तेव्हा मी त्यांना सांगितले होते, की अर्जुनला क्रिकेटच्या प्रेमात पडू द्या, त्याला ती संधी द्या. त्याने कामगिरी केल्यानंतर तुम्ही त्याबाबत चर्चा करा. त्याच्यावर दबाव आणू नका, कारण माझ्यावर माझ्या पालकांचा दबाव कधीच नव्हता. माझ्या पालकांनी मला बाहेर जाण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य दिले. अपेक्षांचे कोणतेही दडपण नव्हते. ते फक्त प्रोत्साहन आणि समर्थन होते. मीही अर्जुनला हेच सांगत राहिलो की हा प्रवास आव्हानात्मक असेल."
सचिनप्रमाणेच अर्जुननेही आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबईसाठी केली होती. भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवण्यापूर्वी तो मुंबईसाठी ज्युनियर क्रिकेट खेळला. २०२१मध्ये अर्जुनने मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविले आणि त्यांच्यांकडून दोन ट्वेंटी-२० सामने खेळले. २०२२ मध्ये अर्जुनची मुंबईच्या रणजी संघात निवड करण्यात आली होती, परंतु त्याला खेळण्याच संधी मिळाली नाही. २०२२-२३ हंगाम सुरू होण्यापूर्वी अर्जुनने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. २३ वर्षीय खेळाडूने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची चमकदार सुरुवात केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"