मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पण, क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. आचरेकर सर घरातूनही कमीच बाहेर पडत. त्यांना 1990 साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2010 मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12 फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.