मुंबई - क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सामाजिक कार्यात रस घेताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी सचिन तेंडुलकर रस्त्यावर लोकांना हेल्मेट घालण्याच सल्ला देताना दिसला होता. सचिन तेंडुलकर स्वत: लोकांना हेल्मेट घालावं यासाठी आवाहन करत होता. शुक्रवारी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर अशाच प्रकारे दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्यासाठी आवाहन करताना दिसला. सचिनने स्वत: फेसबुक आणि ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दुचाकीस्वारांशी संवाद साधला आहे. सचिनने व्हिडीओला 'हेल्मेट डालो 2.0' असं कॅप्शनही दिलं आहे.
व्हिडीओमध्ये सचिन आपल्या कारच्या विंडोची काच खाली करुन दुचाकीस्वारांशी बोलताना दिसत आहे. सचिन हेल्मेट घालण्याचा आग्रह करताना दिसत आहे. मात्र यावेळी त्याने बाइकवर प्रवास करणा-या दुस-या प्रवाशानेदेखील बाइक घातलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. फक्त बाइक चालवणारा नाही, तर त्याच्यासोबत असणा-या दुस-या व्यक्तीनेही हेल्मेट घालणं सुरक्षेसाठी गरजेचं आहे असं सचिन सांगताना दिसत आहे.
सचिनने याआधीही अशाच प्रकारे लोकांना सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं होतं. काही दिवसांपुर्वी सचिनने शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवरुन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहा यांना पत्र लिहिलं होतं. सचिनने केवळ वाहतूककोंडीवर नाराजी व्यक्त न करता ती सोडवण्यासाठी उपायदेखील सुचविले होते. त्यात जलवाहतुकीचा पर्याय सुचवण्यात आला होते. रस्ते आणि पादचारी पुलांवरील होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र फेरीवाला क्षेत्र निर्माण करा, असे सचिनने सुचविले होते.
देशातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. वाहतूकतज्ज्ञ आणि देशी-विदेशी सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये मुंबईच्या गर्दीबाबत भाष्य केले जाते. ही कोंडी फोडण्यासाठी उपायदेखील सुचवण्यात आले होते. मात्र अद्याप ते कागदावर आहेत. त्यामुळे गर्दी, वाहतूककोंडीतून प्रवास करावा लागतो. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा मूळ कणा रेल्वेमार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जादा लोकल सोडण्याची क्षमता पूर्ण झाल्याने आता अधिक लोकल सोडणे अशक्य असल्याचे रेल्वे अधिकारी खासगीत कबूल करतात. शहरांतील रस्त्यांची अवस्था सर्वश्रुत आहे. शहरांत ठिकठिकाणी विकासकामे सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जलवाहतूक सुरू झाल्यास त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल, शिवाय दरदेखील परवडणारे असल्यामुळे सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद लाभेल. यामुळे हाँग काँगच्या धर्तीवर जलवाहतूक सुरू केल्यास फायदा होईल, असे सचिनने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.