मुंबई - भारतीय क्रिकेट इतिहासात 14 ऑगस्ट या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्याच दिवशी 1990साली सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. 17 वर्ष आणि 112 दिवसांच्या सचिनने कसोटीतील पहिले शतक 14 ऑगस्ट 1990 साली लगावले होते. मँचेस्टर येथे त्याने इंग्लंडविरूद्ध नाबाद 119 धावांची खेळी खेळली होती. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ग्रॅहम गूच, माईक आर्थटन आणि रॉबिन स्मिथ यांच्या शतकाच्या जोरावर 519 धावांचा डोंगर उभा केला होता.
प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली. रवी शास्त्री व नवज्योत सिंग सिद्धू हे सलामीवीर अवघ्या 48 धावांवर माघारी परतले. त्यानतंर मोहम्मद अझरूद्दीन आणि संजय मांजरेकर यांनी अनुक्रमे 179 व 93 धावा करून भारताला पहिल्या डावात 432 धावांपर्यंत मजल मारून दिली.
(India vs England Test: विराट कोहलीला पश्चाताप होतोय; केले भावनिक आवाहन )
इंग्लंडने दुस-या डावात 4 बाद 340 धावांवर डाव घोषित केला. त्यात अॅलन लम्बच्या 109 धावा होत्या. भारतासमोर विजयासाठी 408 धावांचे आव्हान होते. दुस-या डावातही भारतीय फलंदाजांचे माघारसत्र कायम राहिले. भारताचे सहा फलंदाज 183 धावांवर माघारी परतले होते आणि अशा वेळी सचिनने सामन्याची धुरा खांद्यावर घेतली. त्याने (नाबाद 119) मनोज प्रभाकरसह (नाबाद 67) सातव्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने हा सामना अनिर्णीत राखला.
(सचिनची इंग्लंडला शाबासकी अन् टीम इंडियाला मोलाचा सल्ला!)
सचिनचे हे कारकिर्दीतले पहिले कसोटी शतक ठरले. त्यानंतर सचिनने कसोटीत 51 आणि वन डेत 49 शतक झळकावले. कसोटीत नाबाद 248 धावा ही सचिनची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने 2004 मध्ये बांगलादेशविरूद्ध ढाका कसोटीत ही खेळी साकारली होती. वन डेत द्विशतक झळकावणारा तो पहिला पुरूष क्रिकेटपटू आहे. त्याने 2010मध्ये ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद 200 धावा केल्या होत्या.