इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेत न खेळून बीसीसीआयशी पंगा घेतला आणि त्यांना वार्षिक कराराला मुकावे लागले. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी इशान आणि अय्यरबद्दल मत व्यक्त केले. आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar) देशांतर्गत क्रिकेटचे खेळाडूंना होणारे फायदे सांगितले आहेत आणि त्याच्या या पोस्टचा इशान व श्रेयस यांच्याशी संबंध जोडला जात आहे. बीसीसीआयनेही आता राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे असा फर्मान काढला आहे. ''जेव्हा राष्ट्रीय संघातील खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळतो, तेव्हा त्याच्याकडून युवा खेळाडूंना शिकायला मिळते आणि त्यांच्या खेळाचा दर्जाची सुधारतो. त्यातून भारताला उदयोन्मुख खेळाडू मिळतात,''असे सचिनने लिहिले.
मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर सचिनने पोस्ट लिहिली की,''रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमहर्षक होत आहेत. मुंबईने आधीच अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याने शेवटच्या दिवसापर्यंत रोमांचक वळण घेतले आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत, मला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी मुंबईसाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळलो. मला रणजी करंडक खेळण्याची खूप आवड आहे. जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा मुंबईच्या संघात ७ ते ८ भारतीय खेळाडू होते आणि त्यांच्यासोबत खेळणे खूप छान वाटत होते."
''भारतीय खेळाडू जेव्हा जेव्हा त्यांच्या स्थानिक संघासोबत खेळतात तेव्हा त्यांच्या खेळाचा दर्जा तर वाढतोच शिवाय अनेक युवा खेळाडूंना नवीन ओळखही मिळते. घरच्या संघातील अव्वल खेळाडूंच्या सहभागामुळे कालांतराने चाहतेही त्यांच्या घरच्या संघाला पाठिंबा देताना दिसतात. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटला प्रत्येक प्रकारे समान प्राधान्य देत आहे हे पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे,''असेही सचिनने लिहिले.