Join us  

मास्टर ब्लास्टरची 10 नंबरची जर्सी झाली रिटायर्ड, बीसीसीआयचा अनौपचारिक निर्णय

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे मॅचेसमध्ये 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. पण आता टीम इंडियाचा कोणताही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून मैदानात दिसणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 10:17 AM

Open in App

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे मॅचेसमध्ये 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. पण आता टीम इंडियाचा कोणताही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून मैदानात दिसणार नाही. बीसीसीआयने खेळाडुंच्या सहमतीने भारतीय क्रिकेट टीममधील कुठलाही खेळाडूला 10 नंबरची जर्सी दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय अनौपचारिक असल्याचं बोललं जातं आहे. बीसीसीआयच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा कुठलाही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून दिसणार नाही. 

10 नंबरची जर्सी फक्त सचिनच्या नावे असावी, खेळाडू आणि बोर्डाकडून सचिनला देण्यात आलेला सन्मानाचं एक प्रतिक म्हणून ही जर्सी असावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 2013मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. मार्च 2012मध्ये पाकिस्तान विरूद्ध झालेल्या वनडे मॅचमध्ये सचिनने 10 नंबरची जर्सी घातली होती. त्यानंकर पाच वर्ष कुणीही 10 नंबरच्या जर्सीचा वापर केला नाही.यावर्षी ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरूद्ध झालेल्या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 10 नंबरची जर्सी घातली होती. तेव्हा क्रिकेटप्रेमींनी त्याला जोरदार विरोध केला. सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरला ट्रोल करण्यात आलं तसंच शार्दुल सचिन तेंडुलकर बनण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे यापुढील वादातून वाचण्यासाठी बीसीसीआयने 10 नंबरची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

10 नंबरच्या जर्सीमुळे विनाकारण वाद निर्माण होईल आणि त्याचा सामना टीम इंडियाच्या खेळाडुंना करावा लागेल. म्हणूनच अनौपचारिकपणे जर्सी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया ए साठीचे खेळाडू 10 नंबरची जर्सी घालू शकतात पण आंतरराष्ट्रीय सामन्यात ही जर्सी वापरली जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2013मध्ये मास्टर ब्लास्टरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएल टीम मुंबई इंडियन्सने 10 नंबरची जर्सी रिटायर केली होती.  

टॅग्स :सचिन तेंडूलकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय