मुंबई - बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस साजरा होतोय. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीही मोठी गर्दी जमली होती. अमिताभ यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे, अमिताभ यांनीही बंगल्याच्या बाहेर येत चाहत्यांना हात दाखवून अभिवादन व नमस्कार केला. सर्वसामान्य चाहत्यांपासून सेलिब्रिटी आणि इंटरनॅशनल ब्रँडही बिग बींचे चाहते आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर हेही अमिताभ बच्चन यांचे चाहते असून त्यांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकार आले, स्टार झाले आणि निघूनही गेले. मात्र, अमिताभ बच्चन त्यास अपवाद ठरले. आजही चित्रपटातील त्यांची एंट्री टाळ्या अन् शिट्यांची दाद मिळवते. गेली ५ दशकं म्हणजे ५० वर्षांपासून मनोरंजनाच्या माध्यमातून अमिताभ यांनी घराघरात आणि मनामनात आपलं स्थान पक्क केलंय. त्यामुळेच, अमिताभ बच्चन यांनी तीन पिढ्यांच्या मनावर राज्य केलंय. वडिल, मुलगा आणि नातूही ज्या कलाकाराचा फॅन आहे, घरातील तीन पिढ्या ज्यांच्या कसदार अभिनयाचे आणि सिनेमांचे साक्षीदार आहेत, ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन होत. म्हणूनच, अमिताभ यांचा चाहता वर्ग हा गल्ली ते दिल्ली आणि सामान्य ते असामान्य असा आहे. कौन बनेगा करोडपती या गेम शोमुळे ते हजारो कुटुंबांशी थेट जोडले गेले आहेत. तर, सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणूनही त्याचा गौरव आहे. म्हणूनच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने अमिताभ यांना शुभेच्छा देताना, त्याच स्टाईलने प्रश्न विचारला आहे. सचिनने चाहत्यांना प्रश्न विचारत ४ ऑप्शनही दिले आहेत.
एवढ्या वर्षे तुम्ही सर्वांना प्रश्न विचारले आहेत. आज मी सर्वांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारतो, असे म्हणत सचिनने केबीसी स्टाईल एक प्रश्न विचारला आहे. त्याला ४ पर्यायही दिले आहेत. अमिताभ बच्चन कौन है?, असा प्रश्न सचिनने विचारला. त्यावर, A) सुपरस्टार, B) आयकॉन, C) लिजेड, D) वरील सर्व...
असे पर्याय सचिनने दिले आहेत. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन आपलं उत्तरही दिलंय. त्यात, सर्वाधिक ऑप्शन D हेच उत्तर चाहत्यांनी दिलंय.
दरम्यान, चाहत्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना 'आनंद' देत करोडपती बनवणारा महानायक म्हणजे अमिताभ बच्चन होयं. बिग बी आज ८१ वर्षांचे झाले, त्यांना जगभरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत.