मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे रविवारी झालेले आयपीएल पदार्पण चर्चेचा विषय ठरला. मुंबई इंडियन्सने अर्जुनला पदार्पणाची संधी दिली आणि यासह एक अनोखा विक्रम घडला. अर्जुनच्या रूपाने पुन्हा एकदा वानखेडेवर तेंडुलकर नाव गाजले. तसेच आयपीएल खेळणारी सचिन आणि अर्जुन ही पहिलीच पिता-पुत्र जोडी ठरली.
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अर्जुनने आपल्या पहिल्या षटकात ५ धावा दिल्या. तसेच एक विकेट्स पटकवण्याची त्याला संधी देखील होती. मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडला. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने देखील मुंबई इंडियन्ससाठी पहिल्यांदा गोलंदाजी केली होती, तेव्हा ५ धावा दिल्या होत्या.
२००९ साली पहिल्यांदा सचिनने मुंबई इंडियन्सकडून पहिले षटक टाकले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सचिनने आयपीएलमधील पहिले षटक कोलकाताविरुद्धच टाकले होते. त्यामुळे पिता-पुत्राच्या या योगायोगची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच सचिनची मुलगी सारानेही हा योगायोग इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. साराही मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती.
अर्जुनने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात २ षटके टाकली आणि १७ धावा दिल्या. माजी क्रिकेटपटू श्रीशांतने अर्जुनच्या गोलंदाजीवर आपले मत मांडले. श्रीशांत म्हणाला की अर्जुनने आपला पहिला सामना योग्य आत्मविश्वासाने खेळला आहे. त्याचवेळी, क्रिकबझशी बोलताना विरेंद्र सेहवाग म्हणाला की, मला अर्जुनला षटकार मारताना पाहायचे होते. पण मला आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये मला अर्जुन पाहायला मिळेल.
सचिनची मुलासाठी खास पोस्ट-
सचिनने अर्जुनसाठी एक खास पोस्टी केली आहे. या पोस्टमध्ये सचिनने म्हटलं की, आज क्रिकेटपटू म्हणून तू महत्त्वाचे पाऊल टाकले आहेस. तुझा वडील या नात्याने, तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाबद्दल उत्कट प्रेम करणारा, मला माहीत आहे की, तूदेखील खेळाचा योग्य तो आदर करशील आणि हा खेळही तुझ्यावर प्रेम करेल. तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की, तू हे कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. खूप खूप शुभेच्छा, असं सचिनने म्हटलं आहे.
Web Title: Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar made his IPL debut against Kolkata
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.