मुंबईः आई जास्त आवडते की बाबा?, यासारखे प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पेचात टाकतात. दोन आवडत्या व्यक्तींमध्ये एकाला झुकतं माप देणं खरोखरच खूप कठीण असतं ना?... पण, भारताचा जगज्जेता कर्णधार, असं मानाचं बिरुद मिरवणाऱ्या पृथ्वी शॉने अशाच 'गुगली' प्रश्नावर मस्त 'चिकी रन' काढली आणि सगळ्यांचीच दाद मिळवली.
पृथ्वी शॉ आज 'लोकमत'च्या कार्यालयात आला होता. त्यावेळी सगळ्यांसोबत केक कापून, फोटो काढून, ऑटोग्राफ देऊन त्यानं सगळ्यांना खूश केलं. पण, पत्रकार मंडळींचं तेवढ्याने समाधान होणारच नव्हतं. त्याच्यावर प्रश्नांचे बाउन्सर, यॉर्कर आणि गुगली टाकून त्याची 'विकेट' काढण्याची व्यूहरचना टीमने आखली होती. त्याच्यासोबत 'रॅपिड फायर राउंड'चं जाळं विणण्यात आलं होतं. पण, त्यातून पृथ्वी असा काही सटकला की सगळे बघतच बसले.
पृथ्वी शॉसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आदर्श आहे आणि 'गुरू' राहुल द्रविडबद्दल त्याच्या मनात आदर आहे. हे ओळखूनच, त्याच्यासाठी एक प्रश्न तयार करण्यात आला होता. तुला सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह जास्त आवडतो की राहुल द्रविडचा कव्हर ड्राइव्ह?, असं विचारताच पृथ्वीच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या. काही क्षण त्याने विचार केला आणि 'सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह' असं उत्तर दिलं. पण काही सेकंदांतच, शर्टाला लावलेल्या लेपल माइकजवळ जात, राहुल द्रविडचा कव्हर ड्राइव्ह, असंही तो पुटपुटला. त्याच्या या चलाखीला सगळ्यांनीच हसून दाद दिली.
सचिन आणि राहुल यांच्यात डावं-उजवं करताना किंचित गोंधळलेल्या पृथ्वीनं आवडत्या कर्णधाराचं नाव मात्र पटकन सांगितलं. विराट कोहली की महेंद्रसिंह धोनी, या प्रश्नावर त्यानं ठामपणे एमएसडी असं उत्तर दिलं. पृथ्वी शॉसोबतचं फेसबुक लाइव्हः