नवी दिल्ली - फिफा वर्ल्डकपचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे जगभरातील दिग्गज खेळाडूंचे याकडे लक्ष लागले आहे. बुधवारी इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया यांच्यातील उपांत्य सामन्यातही चुरस पाहायला मिळाली. क्रोएशियाने इंग्लंडवर धडाकेबाज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले होते. तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि 'मुल्तानचा सुलतान' वीरेंद्र सेहवाग यांनीही आपापला संघ निवडला होता. सचिन-सेहवागच्या या लढतीत अखेर सेहवाग जिंकला तर इंग्लंड संघाला पाठिंबा देणारा सचिन हरला.
फिफा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. या सामन्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंग्लंड संघाला आपला सपोर्ट दर्शवला होता. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरन व्हिडिओ शेअर करत इंग्लंड संघाला विजयासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. तर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि इंग्लंड संघाविरुद्ध नेहमीच आपल्या भावना व्यक्त करणारा विरेंदर सेहवागने क्रोएशियाला पाठिंबा दिला होता. सेहवागने लोकरीने बाळासाठी टोपी विणतानाचे छायाचित्र ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले. त्यामध्ये लोकर आणि सुई दिसून येत आहे. या छायाचित्राद्वारे जगातील फुटबॉल विश्वात क्रोएशिया या नवीन बाळाचा जन्म होत असल्याचेच सेहवागने सूचवले आहे. यापूर्वीही इंग्लंड आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यांवेळी सेहवागने ट्विटवरुन इंग्लंडला फटकारले आहे. इंग्लंडचे पत्रकार पिअर्स मॉर्गनला ट्विटवरुन तोडीस तोड उत्तर देत सेहवागने चांगलाच धडा शिकवला होता.
फिफा विश्वचषकातील सामन्यांना पाठिंबा दर्शवताना साहजिकच सेहवागचा कल इंग्लंडच्या विरोधात राहिला. सेहवागने क्रोएशियाला चिअर्स केले. तर सचिन तेंडुलकरने इंग्लंड टीमला सपोर्ट दर्शवला होता. मात्र, क्रोएशियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात सेहवागच्या संघाचा विजय झाला तर इंग्लंडचा पराभव. त्यामुळे सेहवाग जिंकला अन् सचिन हरला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.