नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कुल्टर नाईल आपल्या सहकारी खेळाडूंचा आयपीएलमधून माघार घेण्याच्या निर्णयासोबत सहमत आहे, पण त्याच्या मते तो मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्ये जास्त सुरक्षित आहे. कारण भारत सध्या कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ॲण्ड्र्यू टाय कोविड-१९ चे रुग्ण वाढल्यामुळे त्याच्या देशात प्रवेश निषेध होण्याच्या शंकेमुळे पर्थला रवाना झाला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा केन रिचर्डसन व ॲडम झम्पा यांनीही वैयक्तिक कारणांचा हवाला देताना स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कुल्टर नाईलला या तिघांबाबत कळले, त्यावेळी त्याने आश्चर्य व्यक्त केले. त्याचा मुंबई इंडियन्ससोबत पाच कोटी रुपयांचा करार आहे.
तो म्हणाला, ‘प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते. त्यांच्यासाठी परिस्थिती वेगळी आहे. मी टायच्या घरी परतण्याच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित झालो होतो. त्यानंतर झम्पा व रिचो यांनीसुद्धा माघारी परतण्याचा निर्णय घेतला. ते कुठले खेळाडू आहेत, हे तुम्ही निश्चितपणे समजून घ्यायला हवे.’कुल्टर नाईल म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वी मी झम्पासोबत चर्चा केली. त्याच्यासोबत घरी परतण्याबाबत वादही झाला. पण, माझ्या मते सध्याच्या घडीला घरी परतण्यापेक्षा बबलमध्ये राहणे अधिक सुरक्षित आहे.’
स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स व स्टीव्ह स्मिथ आयपीएलचा भाग आहेत. भारतातून बाहेर पडणे दर दिवशी कठीण होत आहे. त्यात काही देशांनी उदा. ब्रिटन व न्यूझीलंडने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे आणि ऑस्ट्रेलियाही याबाबत विचार करीत आहे. कुल्टर नाइल म्हणाला,‘मी काय घडते, याची प्रतीक्षा करणार आहे. जर आम्हाला मायदेशी परतायचे असेल तर आम्हाला सुरुवातीला दुबईमध्ये दोन आठवडे विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतर आम्हाला मायदेशी परतता येईल. पण, सर्वकाही सुरळीत होईल, असा मला विश्वास आहे.’