मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणारा फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या हलाखीचे जीवन जगत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घर चालवणे, त्याच्यासाठी फार कठीण झाले आहे. त्यामुळे विनोद कांबळी हा आता कामाच्या शोधात आहे. त्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो आता नोकरी शोधतोय असे त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले. यानंतर विनोद कांबळीच्या आवाहनाला एका मराठी उद्योजकाने तत्काळ मदतीचा हात पुढे करत नोकरीची ऑफर दिली आहे.
विनोद कांबळीने आपल्या आर्थिक संकटासंदर्भात केलेले भाष्य आणि पैशांची गरज असल्याची माहिती दिल्यानंतर अहमदनगरमधील एका मराठी उद्योजकाने विनोद कांबळीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीमध्ये चांगल्या पदावरील नोकरीची ऑफर थोरात यांनी कांबळीला दिली आहे.
मराठी उद्योजकाने किती पगार केलाय ऑफर?
संदीप थोरात यांनी या नोकरीसाठी पगार किती असेल, हे सुद्धा सांगितले आहे. विशेष म्हणजे विनोद कांबळीवर ओढावलेल्या स्थितीबद्दल बोलताना थोरात यांनी दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचाही उल्लेख केला आहे. माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये १० ब्रँच होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्समधील नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की, त्यात मायक्रो मॅनेजमेंट चालते. याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालते तीच शिस्त ते या कंपनीमध्ये लावू शकतात, असे मला वाटते. म्हणून मी त्यांना एक लाख रुपये पगाराची ऑफर मुंबईमध्ये करणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.
हे आपले अपयश आहे
मला महाराष्ट्राचे विशेष वाटते. महाराष्ट्रात खूप चांगल्या व्यक्ती आहेत मात्र त्यांच्या वार्धक्याच्या काळात त्यांच्यावर ही वेळ का येते मला कधीच कळले नाही. सिंधुताई सपकाळांना त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकांसमोर पदर पसरुन जगावे लागले. तीच वेळ विनोद कांबळींवर आलेली आहे. १९९० ते २००० या कालावधीमध्ये विनोद कांबळींनी अतिशय कामगिरी करुन भारताचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. मात्र त्या व्यक्तीला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावी लागत असेल तर मला वाटते की हे आपले अपयश आहे, असे थोरात म्हणाले. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, विनोद कांबळीला 'बीसीसीआय'कडून ३० हजार रूपयांचे पेन्शन दरमहा मिळते. तो एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. भारतीय क्रिकेटमधील ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईचा धडाकेबाज खेळाडू विनोद कांबळी याने दमदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या सात कसोटींमध्ये ७९३ धावा आणि ११३चा स्ट्राईक रेट अशी त्याची धुवाँधार फलंदाजी सुरू होती. २२४ आणि २२७ ही त्याची त्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण नंतर काही कारणास्तव विनोद कांबळी संघातून बाहेर झाला आणि त्याला नंतर फारशी संधी मिळालीच नाही.