झारखंड : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि धोनी यांच्या भेटीनंतर तर कॅप्टन कूल भाजपाचा झेंडा हाती घेणार, हे जवळपास निश्चित समजले जात होते. त्यामुळे धोनी आणि भाजपा अशा अनेक बातम्या रंगल्या. असे असताना धोनीची पत्नी साक्षीनं भाजपा सरकार विरोधात नाराजी प्रकट केली आहे. तिनं भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. झारखंडमधील भाजप सरकारवर निशाणा साधत साक्षीनं सोशल मीडियावर तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. झारखंड सरकारकडून राज्यात लोडशेडिंग नसल्याचा दावा केला जात होता आणि साक्षीनं त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात दिवसातून अनेक तास वीज जाते, असे सांगत साक्षीनं तक्रार नोंदवली. तीनं सोशल मीडियावरही नाराजी प्रकट केली. तिनं लिहीले की,''रांचीतील लोकं रोज लोडशेडिंगचा सामना करत आहेत. दिवसातून चार ते सात तास वीज नसते.''
झारखंड राज्य सरकारचा कार्यकाळ 27 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनी काय काम केलं, याचे दावे केले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात लोडशेडिंग नसल्याचा दावा केला आहे.