मुंबई : कॅप्टन विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवरील पोस्टनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पकडला. कोहलीनं धोनीसोबतचा फोटो शेअर करताना भावनिक मॅसेज लिहिला. त्यामुळे धोनी आज निवृत्ती जाहीर करतो की काय अशी चर्चा रंगली. पण, यावर धोनीची पत्नी साक्षी हीने मोठा खुलासा केला आहे. या सगळ्या अफवा असल्याचे मत साक्षीने ट्विटरवर व्यक्त केले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या बातमीला पूर्णविराम लागला.
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं निवृत्त व्हावं, अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. कोहलीनं इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.
कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहे. भारतात 2016मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 4 फलंदाज 94 धावांत माघारी परतले होते. त्यावेळी कोहली आणि तत्कालीन कर्णधार धोनी खेळपट्टीवर होते. त्या सामन्यात कोहलीनं 51 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 82 धावा केल्या, तर धोनी 10 चेंडूंत 3 चौकारांसह 18 धावांवर नाबाद राहिला. धोनीनं कोहलीला एकेका धावेसाठी अक्षरशः पळवलं होतं. धोनीच्या चपळतेनं कोहलीला चांगलेच दमवले होते.
याच सामन्यातील त्या अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.''