ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याची डॉक्युमेंटरी Shane लवकरच येणार आहे. त्यात वॉर्ननं काही आश्चर्यचकीत करणारे किस्से सांगितले आहेत. यात वॉर्ननं २८ वर्षांपूर्वीची एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची मान शरमेनं खाली गेली आहे. यात वॉर्ननं पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक ( Salim Malik) याच्यावर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
शेन वॉर्ननं news.com.au ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, १९९४मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तेव्हा कराची कसोटीपूर्वी पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलीम मलिकने मला व टीम मे याला खराब गोलंदाजी करण्यासाठी २ लाख ७६ हजार डॉलरची लाच ( तेव्हाचे ६२ लाख) देऊ केली होती. मलिक म्हणाला होती की, जर आम्ही आपल्याच घरी कसोटी मॅच हरलो तर फॅन्स त्यांच्या घराला आग लावतील.
''कराची कसोटी आम्हीच जिंकू असा आम्हाला विश्वास होता. सामना सुरू असताना कुणीतरी ड्रेसिंग रुमच्या बाहेरून आत येण्याची परवानगी मागितली. त्यानं त्याचं नाव सलीम मलिक असे सांगितले. आम्ही दरवाजा उघडला आणि त्याला आत बसायला सांगितले. बोलत असताना मलिकनं आम्ही हरू शकत नाही. जर आम्ही हरलो तर आमच्यासोबत काय होईल, याचा तुम्हाला अंदाजा नाही. आमची घरं पेटवली जातील आणि आमच्या कुटुंबियांनाही,'' असे वॉर्नने सांगितले.
तो म्हणाला, जेव्हा ही चर्चा झाली, तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७ विकेट्स घ्यायच्या होत्या. मलिकच्या प्रस्तावावर काय करावे हेच कळत नव्हते. मी थक्क झालो होते. त्या प्रकारानंतर आतापर्यंत ३० वर्षांत आमच्यात कोणतंच बोलणं झालं नाही. या प्रकरणावर चर्चाही झाली नाही, असे वॉर्न म्हणाला. मलिकची ऑफर ऐकून मी काहीकाळ भरकटलो होतो. काय करावं हेच कळत नव्हतं. पण, मी त्याला मला अतिरिक्त पैसा नकोय, असे स्पष्ट सांगितले.
पाकिस्ताननं हा सामना एक विकेट राखून जिंकला. १५० धावा देत ८ विकेट्स घेणारा वॉर्न प्लेअर ऑफ दी मॅच ठरला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ३१४ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यात इंजमाम उल हकनं नाबाद ५८ धावा करून विजय पक्का केला. इंजमामनं १०व्या विकेटसाटी मुश्ताक अहमदसह ५७ धावांची नाबाद भागीदारी केली. मुश्ताकनं २० धावा केल्या. वॉर्न म्हणाला, आम्हाला ती कसोटी हरायला नको हवी होती. इंजमामसाठी आम्ही LBW ची अपील केली होती, परंतु अम्पायरनं काहीच रिप्लाय दिला नाही. अम्पायरचा तो निर्णय चुकीचा होता.
सामन्यानंतर वॉर्ननं ही गोष्ट कर्णधार मार्क टेलर आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांना सांगितली. त्यांनी यासंदर्भात रेफरीशी चर्चा केली. २०००मध्ये सलीम मलिकवर फिक्सिंगच्या आऱोपाखाली आजीवन बंदी घातली गेली.