ठळक मुद्देगौतम गंभीरने मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी दिली विराट कोहलीलाविराट कोहलीच्या पहिला वन डे शतकासाठी केले कौतुकगंभीरने नाबाद 150 धावा करूनही नाकारला पुरस्कार
मुंबई : भारताच्या यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या गौतम गंभीरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजयाचा नायक असलेल्या गंभीरने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान कोणी नाकारू शकत नाही. संघाला गरज पडली तेव्हा हा डावखुरा फलंदाज तारणहार बनला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा तो कणा होता. त्याने आपल्या खेळीने नेहमीच लोकांची मनं जिंकली, परंतु त्याच्यातील एक सच्चा खेळाडू नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे. विजयाचे श्रेय एकट्याचे नसून ते सहकाऱ्यांचेही असते याची जाण त्याने आपल्या कृतीतून दाखवली आहे. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीला एका सामन्यात गंभीरने चक्क त्याला मिळालेली मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी दिली होती.
24 डिसेंबर 2009 हा तो दिवस... भारतीय संघ कोलकाता येथील इडन गार्डनवर श्रीलंका संघाचा सामना करत होता. पाहुण्या श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6/315 धावा चोपून काढल्या होत्या. सलामीवीर उपुल थरंगाने 118 धावांची बहारदार खेळी केली होती आणि कुमार संगकाराने त्याला 60 धावा करून योग्य साथ दिली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग (10) आणि सचिन तेंडुलकर (8) हे झटपट माघारी परतले होते. भारताची अवस्था 2 बाद 23 धावा झाली होती. त्यावेळी गौतम गंभीर आणि
विराट कोहली हे खंबीरपणे खेळपट्टीवर उभे राहिले होते. कोहलीने वन डेतील पहिले शतक केले ते याच सामन्यात.
गंभीर आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 224 धावांची भागीदारी केली. 107 धावा करून कोहली माघारी परतला, परंत गंभीरने त्यानंतर दिनेश कार्तिक (19) सह अखेरपर्यंत खिंड लढवून भारताला 11 चेंडू राखून विजय मिळवून दिला. गंभीरने नाबाद 150 धावांची खेळी केली. या सामन्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रवी शास्त्रींनी मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी गंभीरला बोलावले. त्यावेळी गंभीरने या पुरस्कार स्वीकारण्यास मनाई केली आणि ती ट्रॉफी कोहलीला दिली. कोहलीचा वन डे क्रिकेटमधील पहिल्या शतकासाठी गंभीरने केलेला तो गौरव होता.
पाहा हा व्हिडीओ...
Web Title: Salute: Gautam Gambhir gave Virat Kohli his own trophy of Man of the Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.