नवी दिल्ली : विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघे आपापल्या संघाचे मनोबल वाढवतात. दोघांमध्ये धावांची भूक सारखीच आहे. मात्र दोघांच्या समर्पण वृत्तीत फरक असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने बुधवारी व्यक्त केले.
विराट आणि स्मिथ सध्याच्या काळात आघाडीचे क्रिकेटपटू आहेत, यात शंका नाही. दोघेही नवनवीन रेकॉर्ड स्वत:च्या शिरपेचात रोवत असल्याने दोघांंमध्ये सर्वोत्कृष्ट कोण, या चर्चेला उधाण आले. हर्षा भोगले यांच्यासोबत ‘क्रीकबज इन कन्व्हर्सेशन’मध्ये बोलताना वॉर्नर म्हणाला, ‘विराटची धावा काढण्याची वृत्ती स्मिथच्या तुलनेत वेगळी आहे. कोहली विरोधी संघाला कमकुवत करण्यासाठी धावा काढण्यास आतुर असतो तर स्मिथ स्वत:च्या फलंदाजीचा आनंद लुटतो. स्मिथ खेळपट्टीवर कायम राहून धावा आढण्याचा आनंद घेऊ इच्छितो तर कोहली खेळपट्टीवर स्थिरावल्यास संघाला एका शिखरावर नेऊन ठेवतो.’
विराटने काही काळ खेळपट्टीवर घालवल्यास तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजवतो. यामुळे सोबत असलेल्या फलंदाजाला लाभ मिळतो. भावी काळातही विराटपासून प्रेरणा घेत अनेक युवा खेळाडू त्याच्या पावलांवर पाऊल टाकणार आहेत, असा विश्वास व्यक्त करीत वॉर्नर म्हणाला, ‘विराट आणि स्मिथ मानसिकदृष्ट्या फारच कणखर आहेत. दोघांनी मोठी खेळी केली की संघांचे मनोबल उंचावते. दोघे लवकर बाद झाल्यास मैदानावर नीरव शांतता पसरते. जबाबदारीने खेळावे लागेल अशी जाणीव अन्य खेळाडूंमध्ये निर्माण होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मैदानावर विचित्र स्थिती निर्माण होते.’