दुबई : पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार साना मिरने मंगळवारी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) महिला क्रिकेट वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होणारी ती पाकिस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे. आयसीसी महिला चॅम्पियन्सशीप मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान संघाला 3-0 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, या मालिकेत तिची कामगिरी उल्लेखनीय झाली.
मिरने तीन सामन्यांत अनुक्रमे 3/26, 1/37 आणि 3/53 अशी कामगिरी केली आणि 663 गुणांसह महिला गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने तीन स्थानांची झेप घेताना दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझने कॅप्प आणि ऑस्ट्रेलियाच्या मीगन स्कट व जेस जोनासेन यांना मागे टाकले. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ''हे संघाचे यश आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मी ही भरारी घेऊ शकले. आयसीसीचे आभार,'' असे मिरने ट्विट केले.