Sanath Jayasuriya news : अलीकडेच श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या Interim Head Coach म्हणून खेळाडूंना धडे देताना दिसला. सप्टेंबर २०२४ मध्ये श्रीलंकेचा इंग्लंड दौरा पूर्ण होईपर्यंत तो या पदावर कार्यरत राहणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यावेळी सांगितले होते. आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून, जयसूर्याला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण बोर्डाने त्याचा कार्यकाळ ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवला आहे, याशिवाय त्याच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सनथ जयसूर्याची राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यांमधील संघाची चांगली कामगिरी लक्षात घेऊन घेतला आहे. या मालिकांमध्ये जयसूर्याने अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. ही नियुक्ती १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत तो या पदावर राहिल.
जयसूर्या आता श्रीलंका क्रिकेटचा 'हेड'
काही दिवसांपूर्वी भारत श्रीलंका दौऱ्यावर होता. तिथे रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाला वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा विजय साकारला. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये यजमान श्रीलंकेने ऐतिहासिक कामगिरी केली आणि विजय मिळवला. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध देखील श्रीलंकेने अप्रतिम कामगिरी केली होती.
दरम्यान, श्रीलंका क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठे नाव म्हणून सनथ जयसूर्याची ओळख आहे. त्याने ५८६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. डावखुऱ्या या फलंदाजाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये २१,०३२ धावा केल्या आहेत. जयसूर्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०३ अर्धशतके आणि ४२ शतके झळकावण्याची किमया साधली.