नागपूर : श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्यासह तीन माजी क्रिकेटपटूंवर तस्करीचा आरोप करण्यात आला आहे. जयसूर्या आणि अन्य दोन क्रिकेटपटू अवैधरितीने भारतात सडलेल्या सुपाऱ्यांची तस्करी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह तिघांवर कर चुकवल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलीजंट्सने नागपूर येथे कोट्यवधी रुपयांच्या सुपाऱ्यांची तस्करी पकडली. या प्रकरणी तपास केल्या असता जयसूर्याचे नाव समोर आले आहे. पुढील तपासासाठी त्याला मुंबईत रेव्हेन्यू इंटेलीजंट्स पथकासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. श्रीलंका सरकारला या प्रकरणी पत्रही पाठवण्यात आले आहे. अन्य दोन क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली नाही, परंतु त्यांनाही 2 डिसेंबरला तपासासाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसर या प्रकरणाचा तपास उप संचालक दिलीप शिवरे करत आहेत. त्यांनी सांगितले की,''कोट्यवधी रुपयांच्या सुपाऱ्या इंडोनेशियातून श्रीलंकामार्गे भारतात आणल्या जात होत्या. त्यासाठी बनावट कंपन्यांची कागदपत्र दाखवण्यात आली होती. कर चुकवण्यासाठी या सुपाऱ्या श्रीलंकेतून भारतात आणल्याचे दाखवण्यात आले होते.''
या बनावट कंपन्यांच्या स्थापनेसाठी जयसूर्याने त्याच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सुपाऱ्या इंडोनेशियातून आयात केल्यास त्यावर 108 टक्के कर लागतो, परंतु श्रीलंकेमार्गे सुपाऱ्या भारतात आणून तो कर चुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.