आज भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. किंग कोहलीच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच ओडिशातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी विराटला वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे चित्र रेखाटून पटनायक यांनी आपल्या आवडत्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या. किंग कोहली ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. सुदर्शन यांनी विराट कोहलीचे ७ फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले. यामध्ये ३५ बॅट दाखवण्यात आले आहेत आणि काही चेंडूही दिसत आहेत.
दरम्यान, विराट कोहलीचे हे शिल्प तयार करण्यासाठी पटनायक यांनी सुमारे पाच टन वाळू वापरली. हे शिल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वाळू कला संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्यांना विशेष सहकार्य केले. सुदर्शन पटनायक म्हणाले की, माझा आदर्श म्हणून मी विराट कोहलीला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि संपूर्ण क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा देतो.
किंग कोहलीला 'विराट' शुभेच्छापद्म पुरस्कार विजेत्या सुदर्शन पटनायक यांनी जगभरातील ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू चित्रकला स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे आणि देशासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आपल्या वाळूच्या शिल्पकलेतून जनजागृती करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. वाघ वाचवा, पर्यावरण वाचवा, दहशतवाद थांबवा, ग्लोबल वॉर्मिंग थांबवा, कोविड १९ आदी जनजागृतीशी संबंधित शिल्पे देखील त्यांनी साकारली आहेत.
भारताचा 'आठ'वावा प्रताप होणार?वन डे विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होत आहे. किंग कोहलीचा वाढदिवस अन् टेबल टॉपर्स यांच्यातील सामना चाहत्यांसाठी खास असणार आहे. कोलकातातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना होत आहे. सलग सात सामने जिंकलेल्या भारतीय संघासमोर 'आठ'वावा प्रताप करण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ नेदरलॅंड्सकडून पराभूत झाला आहे.