Sandeep Lamichhane 8 years in prison - १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने याला नेपाळ न्यायालयाने आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अनेक विलंबानंतर गेल्या महिन्यात लामिछानेला दोषी ठरवण्यात आले होते. शिशिरराज ढकल यांच्या खंडपीठाने आज झालेल्या सुनावणीनंतर नुकसानभरपाई आणि दंडासह ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याची माहिती न्यायालयाचे अधिकारी रामू शर्मा यांनी दिली.
एका १७ वर्षीय तरुणीने तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप संदीपवर केला होता. सदर प्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची सुनावणीआधी कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, २० लाखांच्या जामीनावर संदीपची सुटका करण्यात आली. बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती.
संदीप लामिछानेची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने देशाच्यावतीने अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतला होता. संदीप लामिछाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला होता. दिल्ली कॅपिटल्सच्यावतीने २०१८मध्ये आयपीएलमध्ये संदीपने पदार्पण केले. संदीपने या लीगमध्ये एकूण दोन हंगामात भाग घेतला आणि एकूण १३ विकेट्स आपल्या नावावर केल्या.