मुंबई : भारतीय संघाचे माजी फलंदाज संदीप पाटील (Sandeep Patil) यांचा आज वाढदिवस आहे. १८ ऑगस्ट १९५६ रोजी जन्म झालेल्या मराठमोळ्या संदीप पाटील यांच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद आहे. मुंबईमध्ये (Mumbai) जन्मलेल्या संदीप यांनी आपल्या फलंदाजीची छाप अवघ्या क्रिकेट विश्वावर सोडली होती. भारत, मध्य प्रदेश आणि मुंबई या प्रमुख संघाकडून त्यांनी अनेक सामने खेळले आहेत. एक प्रभावशाली ऑलराउंडर म्हणून एकेकाळी त्यांचा भारतीय संघात दबदबा असायचा. १९८० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण करून पाटील यांनी आपल्या नवीन डावाची सुरूवात केली होती. BCCI ने देखील ट्विटच्या माध्यमातून पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ४० वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वात अग्रेसर असलेले नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे कारण त्यांचा आज ६६ वा जन्मदिवस आहे. एका षटकात ६ चौकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. संदीप पाटील यांना भारतीय संघातील सर्वात स्टायलिश खेळाडू म्हणून देखील ओळखले जाते. ते मैदानात अथवा मैदानाच्या बाहेर पॉप सिंगर (Pop Singer) होऊन चाहत्यांचे मनोरंजन करायचे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संदीप मधुसूदन पाटील या मुलाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली होती.
१९८२ मध्ये रचला होता इतिहास१९८२ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, या संघामध्ये संदीप पाटील यांनाही स्थान मिळाले होते. याच दौऱ्यामध्ये त्यांनी विश्वविक्रम करून जगाला आपली ओळख करून दिली होती. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने हरल्यानंतर संघ ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) या मालिकेतील दुसरा सामना खेळत होता. या सामन्यात संदीप यांनी १९६ चेंडूत नाबाद १२९ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. ज्यामध्ये १८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४२५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या १३६ धावांवर ५ गडी गमावले होते. संघातील प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते अशा स्थितीत संदीप पाटील यांनी शानदार खेळी करून डाव सावरला. यादरम्यान, प्रतिस्पर्धी संघातील बॉब व्हिलिसच्या (Bob Willis) गोलंदाजीवर पाटील यांनी एका षटकात ६ चौकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. या एका षटकाची इंग्लंडच्या सर्व माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. पाटील यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात पुनरागमन केले आणि पाचव्या दिवसाअखेर सामना अनिर्णित ठरला.
तांत्रिकदृष्ट्या ६ चेंडूत ६ चौकार अवैधपाटील यांचा हा अनेक दिग्गज ६ चेंडूत ६ चौकार म्हणून मोजत नाहीत. कारण या षटकातील पाटील यांच्या पहिल्या तीन चेंडूंनंतर व्हिलीस नाराज झाला होता आणि पुढचा चेंडू अधिक वेगाने टाकण्याच्या नादात नो-बॉल टाकला. या नो-बॉलवर पाटील यांना धाव घेता आली नव्हती. पण पुढच्या ३ चेंडूंवर त्यांनी पुन्हा ३ चौकार मारून एका षटकात ६ चौकार मारण्याची किमया साधली होती.