मुंबई : निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि भारताच्या 1983 विश्वचषक संघाचे शिलेदार संदीप पाटील यांना अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या रुग्णालयात असून गुरुवारी त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री संदीप पाटील यांना होली स्पिरिटमध्ये दाखल करण्यात आले. खरं तर सोमवारी रात्री त्यांची तपासणी केली असता प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती ठिक आहे असे पाटील यांनी सांगितले.
"मला छातीत अचानक त्रास जाणवू लागला आणि रात्री माझा मित्र डॉ. वैभव कासोदेकर यांनी होली स्पिरिट हॉस्पिटल अंधेरी येथे नेले, जिथे माझ्या सर्व चाचण्या झाल्या. माझा ईसीजी नॉर्मल होता. वांद्रे पूर्वेतील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये डॉ. अजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली माझी तपासणी करण्यात आली. त्यांच्याच सल्ल्यानुसार, मी जसलोक हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीनिवास देसाई यांच्या नेतृत्वाखाली सीटी अँजिओ केली. मेन लाइनमध्ये काही कॅल्शियमचे साठे आढळून आले. गुरुवारी अँजिओग्राफी होणार आहे. त्यानंतर डॉक्टर पुढील सूचना देतील", असे पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले.
अलीकडेच लढवली होती निवडणुक
दरम्यान, संदीप पाटील यांनी 2012 ते 2016 या काळात निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी अलीकडेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा अमोल काळे यांच्याकडून पराभव झाला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अलीकडच्या काळात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या अनेकांपैकी एक आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांना देखील 2020 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉंटिगला देखील मागील आठवड्यात रूग्णालयात दाखल करावे लागले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sandeep Patil Health Update 1983 World Cup winner Sandeep Patil was admitted to a hospital in Mumbai due to sudden chest pain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.