मुंबई : सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींनी अजून गुलदस्त्यात ठेवले आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार पाटील विरुद्ध पाटील, अशी चुरशीची निवडणूक होणार होती. पण काही कारणांमुळे ती टळल्याचे म्हटले जात आहे.
हे दोन्ही पाटील आपल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आहेत. पण तरीही त्यांनी एकमेकांसमोर निवडणूकींसाठी शड्डू ठोकले होते. त्यामुळे सर्वांनाच या निवडणूकीची उत्सुकता होती. नेमके कोणते पाटील जिंकून येणार, यासाठी प्रत्येक जण मतदानाकडे डोळे लावून बसले होते. पण काही तांत्रित कारणास्तव ही निवडणूक पाटील विरुद्ध पाटील, अशी होताना दिसणार नाही.
पुढील महिन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या अध्यक्षपदासाठी विजय पाटील यांनी आपाल अर्ज भरला होता. दुसरीकडे भारताच्या विश्वविजेत्या संघातील संदीप पाटील हेदेखील अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत होते, आता या दोन पाटलांपैकी कोणी माघार घेतली, याची उत्सुकता तुम्हाला असेल.
एक क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून संदीप पाटील यांनी चांगलेच नाव कमावलेले आहे. काही वर्षांपूर्वी ते भारताच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. शिवाजी पार्क जिमखान्याचे ते सदस्यही आहेत. त्यामुळे संदीप पाटील यांचे पारडेही जड होते. दुसरीकडे विजय पाटील यांच्यासाठी काही नेतेमंडळीही पुढे सरसारवली होती. विजय पाटील यांना एमसीएच्या प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे पाटील यांनाही चांगलाच प्रतिसाद मिळत होता.
निवडणूक म्हटलं की फक्त अर्ज भरला, प्रचार केला असं नसतं, काही तांत्रिक बाबींची पूर्तताही तुम्हाला करावी लागते. बीसीसीआयच्या नियमांचे पालन केल्यावरच तुम्हाला निवडणूकीमध्ये उभे राहता येते. याच तांत्रिक बाबींमध्ये संदीप पाटील फसल्याचे वृत्त आहे. संदीप पाटील हे सध्या समालोचन करत आहेत. त्यामुळे त्यांनी जर निवडणूक लढवली आणि जिंकली तर त्यानंतर परस्पर हितसंबंध जोपासले जातील, असे म्हटले गेले. त्यामुळे बीसीसीआयच्या या नियमांनुसार संदीप पाटील यांनी माघार घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एमसीएच्या निवडणूकीमध्ये पाटील विरुद्ध पाटील, हा चुरशीचा सामना पाहायला मिळाला नाही.