२०१८मध्ये चेंडू कुरतडण्याचं प्रकरण पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाच्या अंगाशी येण्याची चिन्हे दिसत आहेत. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना त्यासाठी शिक्षा झालीही. पण, आता हे प्रकरण पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बॅनक्रॉफ्टनं या प्रकरणाची कल्पना फक्त आम्हा तिघानाच नाही, तर संघातील गोलंदाजांनाही होती, असा खळबळजनक दावा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क ( Michael Clarke) यानंही बॅनक्रॉफ्टच्या वक्त्यव्याचं अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याचे सांगितले. त्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची सूत्रे हलवण्याचे वृत्त समोर येत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅनक्रॉफ्टनं सँडपेपरचा वापर करून चेंडू कुरडतण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात कर्णधार स्मिथ व उप कर्णधार वॉर्नर यांना प्रत्येकी एक वर्षांची बंदी,तर बॅनक्रॉफ्टला ९ महिन्यांच्या बंदीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. मागील आठवड्यात बॅनक्रॉफ्टनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्याबाबत कल्पना होती, असा दावा केला. त्याला आता क्लार्कचं समर्थन मिळालं.
तो म्हणाला,''तुम्ही एवढ्या मोठ्या स्थरावर क्रिकेट खेळता, तर तुम्हाला याची कल्पना असायला हवी. चेंडू कुरतडून गोलंदाजाकडे दिला जातो आणि त्याला याची कल्पना नाही, हे असं कसं होऊ शकतं?, असे क्लार्कनं स्काय स्पोर्टशी बोलताना सांगितले.
बॅनक्रॉफ्टच्या मुलाखतीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाचा पुन्हा तपास केला जाईल, असे स्टेटमेंट जाहीर केले. ''तीन पेक्षा अधिक लोकांना याची कल्पना असणे, यात आश्चर्य काय आहे?. क्रिकेट खेळणाऱ्या किंवा या खेळाबद्दल किंचितशी माहिती असणाऱ्याच्याही मनात ही शंका येईल. या खेळात चेंडू एवढा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या चिटींगबद्दल तीनपेक्षआ अधिक लोकांना माहिती असल्यास, त्याचे आश्चर्य वाटायला नको.''