दाम्बुला, दि. 20 - भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2019 मध्ये होणा-या विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना आगामी दोन वर्षांत काही खेळाडूंवर विशेष जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार करून खेळाडूंचा वापर करणार का, याबाबत बोलताना कोहली म्हणाला, कुठल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत आहोत, हे महत्त्वाचे आहे. खेळाडूवर विशेष जबाबदारी सोपविण्याची वेळ आलेली आहे. लोकेश राहुल मधल्या फळीत खेळणार असल्याचे निश्चित आहे तर केदार जाधव व मनीष पांडेदरम्यान उर्वरित स्थानासाठी चुरस राहील.
पुढे बोलताना भारतीय कर्णधार म्हणाला, संघातील कोणत्याही खेळाडूनं आपली जागा पक्की समजू नये. राखीव खेळाडूमध्येही तेवढीच क्षमता आहे. भारतीय संघांत बदली खेळाडूंची ताकद खूप मोठी आहे, बदली खेळाडूंमध्येही पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे आपली जागा संघात पक्की करायची असेल तर मैदानात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवण्याचा एकमेव पर्याय सर्वांसमोर उपलब्ध आहे. पहिला सामना सुरु होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
याआधी भारताच्या वन-डे संघात आपली जागा कायम करण्यासाठी एवढी मेहनत कोणालाही घ्यावी लागली नसेल. फण सध्याच्या संघात जागा मिळवण्यासाठी सध्या स्पर्धा वाढतेय. प्रत्येक खेळाडू आपल्या सहकाऱ्यांच्या तोडीस-तोड खेळतोय. अजिंक्य रहाणे हा भारतासाठी वन-डे सामन्यात महत्वाचा खेळाडू आहे, मात्र शिखर आणि रोहीतच्या उपस्थितीत त्याला संघात कधीकधी जागा मिळत नाही, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे हा संघासाठी पहिल्या पसंतीचा सलामीवीर आहे.
विराटला ३ नवे विक्रम नोंदविण्याची संधी
पॉन्टिंगचा विक्रम मोडण्याची संधी : विराटने आतापर्यंत १८९ वन-डे सामने खेळले असून त्यात त्याने २८ शतके झळकावली आहेत. वन-डेमध्ये सर्वाधिक शतके नोंदवण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानंतर रिकी पॉन्टिंग(३०) दुसºया क्रमांकावर आहे. विराटने या मालिकेत तीन शतके ठोकली तर तो पॉन्टिंगचा विक्रम मोडित दुसºया स्थानावर येईल.
षटकारांचे शतक : विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९१ षटकार ठोकले आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकण्यासाठी त्याला ९ षटकारांची गरज आहे. तो वन-डेमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरेल.
जवळजवळ ८०० चौकारांची नोंद: कोहलीने आतापर्यंत १८९ वन-डे सामन्यांत ७६६ चौकार लगावले आहेत. कोहलीला ८०० चौकारांचा पल्ला गाठण्यासाठी ३४ चौकारांची गरज आहे. कोहलीने या मालिकेत दोन-तीन मोठ्या खेळी केल्या तर त्याला ८०० चौकारांचा पल्ला गाठण्याची संधी आहे. वन-डेमध्ये सर्वाधिक २०१६ चौकार लगावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
यातून संघ निवडणार -
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.
श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस, धनुष्का गुणतिलका, चमारा कपूगेदारा, मिलिंद सिरिवर्धना, अकिला धनंजया, मलिंडा पुष्पकुमारा, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामिरा, विश्वा फर्नांडो.
Web Title: Sangakkara's place is not confirmed; some players will be given special responsibility - Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.