नवी दिल्ली : सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे ती भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा. कारण जबरदस्त डायटिंग करून सानियाने फक्त चार महिन्यांमध्ये २६ किलो वजन घटवल्याचे वृत्त समोर आले आहे. सानियाच्या या गोष्टीवर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने एक भन्नाट कमेंट केल्याचेही पाहायला मिळाले आहे.
काही महिन्यांपूर्वी सानिया गरोदर होती. त्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या सर्व काळामध्ये सानियाचे वजजन भरपूर वाढले होते. त्यावेळी सानियाचे फोटो चांगलेच वायरल झाले होते आणि हीच का ती टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, असा सवालही लोकांनी उठवायला सुरुवात केली होती. पण गेल्या चार महिन्यांमध्ये सानियाने तब्बल २६ किलो वजन कमी केल्याची बातमी पाहायला मिळत आहे.
सानियाने २०१० साली पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकबरोबर लग्न केले होते. लग्नानंतरही सानिया भारतातच राहत होती. लग्नानंतरही सानियाने काही काळ टेनिसला जास्त महत्व दिले होता आणि या गोष्टीचे फळही तिला मिळाले. त्यानंतर २०१८ साली सानियाने मुलाला जन्म दिला, त्याचे नाव इजहान असे ठेवण्यात आले. इजहानच्या जन्मानंतर सानियाने होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि तिने जेतेपदही पटकावले होते.
सध्या सानियाने आपल्या इंटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सानियाने चार महिन्यांपूर्वीचा आणि सध्याचा फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोंना पाहून सानियाने खरंच २६ किलो वजन कमी केल्याचे दिसत आहे. चार महिन्यांपूर्वी सानियाचे वजन ८९ किलो होते आणि आता तिचे वय ६३ किलो आहे, ही माहिती सानियाने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. या फोटोवर युवराज सिंगने एक कमेंटही केली आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने काही दिवसांपूर्वी मेक ओव्हर केला होता आणि त्यानं या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघाकडून खेळत असताना स्टायलिश खेळाडू म्हणून युवी ओळखला जायचा. त्याच्या ड्रेसिंग स्टाईलचीही बरीच चर्चा रंगायची. पण, त्याच्या या लूकवर सानिया मिर्झानं खिल्ली उडवली होती.
युवीनं एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यावर लिहिले की,''चिकना चमेला! या लूकचे असेच वर्णन करायला हवे. पण, मी पुन्हा दाढी वाढवू का?'' युवीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला, परंतु सानियानं त्यावरून युवीची फिरकी घेतली. ती म्हणाली,'' पाऊट देऊन गाल लपवण्याचा हा प्रयत्न आहे का? पुन्हा दाढी वाढवं.''
आता युवराजने आपल्यावर केलेल्या कमेंटचा बदला घेतला आहे. युवराजने फक्त तीन शब्दांमध्ये सानियाच्या फोटोवर कमेंट केली आहे. युवराजने सानियाच्या फोटोवर, उफ उफ मिर्ची, अशी कमेंट केली आहे.